महामेट्रोचा राडारोडा पवना नदीपात्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:30 AM2018-12-12T02:30:16+5:302018-12-12T02:30:29+5:30
कारवाईबाबत महापालिका प्रशासनाची चालढकल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी एकीकडे विविध स्तरावर प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने पुणे मेट्रो मार्गिकेच्या सेगमेंटची निर्मिती सुरू असलेल्या नाशिक फाट्याजवळील कास्टिंग यार्डात तयार होणारा राडारोडा थेट पवना नदीपात्रात टाकला जात आहे. त्यामुळे नदीप्रदूषणात भर पडल्याचे दिसून येत आहे.
सांडपाणी, तसेच कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी थेट नदीत सोडणे, राडारोडा टाकणे यामुळे शहरातून वाहणाºया पवना, इंद्रायणी व मुळा या नद्या दूषित झाल्या आहेत. या नद्यांच्या स्वच्छतेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. शहरातील सर्व भागात मैला-सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जात असून, नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठीही नियोजन केले जात आहे.
दुसरीकडे महामेट्रोकडून नदीपात्रातच राडारोडा टाकला जात असल्याचे दिसून येते. पुणे मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी आवश्यक असणाºया सेगमेंट निर्मितीचे काम नाशिक फाटा उड्डाणपुलाजवळील पिंपळे गुरव येथील कास्टिंग यार्डात सुरू आहे. येथे तीन हजार १२३ सेगमेंटची निर्मिती केली जाणार आहे. मात्र, सध्या कास्टिंग यार्डमधील निर्माण होणारा काँक्रीटचा शिल्लक माल व राडारोडा कासारवाडीच्या बाजूने गणपती विसर्जन घाटासमोरील पवना नदीकडेला थेट टाकून दिला जात आहे.
नदीपात्रात राजरोसपणे राडारोडा टाकण्याचा उद्योग सुरू असताना प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे काही ठिकाणी सपाटीकरण करून बांधकामदेखील केलेले आहे. नदीप्रदूषण रोखण्यासाठी विविध संस्था, संघटनादेखील वारंवार पाठपुरावा करीत असतात. उत्स्फूर्तपणे आठवड्यातील एक किंवा दोन दिवस नदी स्वच्छतेसाठी काम करणारे अनेक स्वयंसेवक आहेत. दोन दिवसांपूर्वीच चिखलीतील इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यात आली. कास्टिंग यार्डातील कोणतेही साहित्य बाहेर जाऊ नये यासाठी यार्डच्या कडेने पत्र्याचे कुंपण लावण्यात आले आहे. मात्र, ठेकेदाराच्या कामगारांनी कुंपणासाठी लावलेले पत्रे काढून येथील राडारोडा नदीपात्रालगत टाकला.
तपासणी झालेल्या रिलीज टेस्ट ट्युबचे साहित्य ठेकेदाराच्या कामगारांनी यार्डाच्या कुंपणाबाहेर टाकले होते. त्यामुळे हे साहित्य नदीपात्रात गेले. मंगळवारी ते हटविण्यात आले. पत्र्याचे कुंपण लावण्यात येणार आहे. अशाप्रकारे राडारोडा टाकल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.
- गौतम बिºहाडे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, रिच वन, पुणे मेट्रो