कळस चोरीविरोधात कार्ला फाट्यावर महाआरती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 01:40 AM2018-10-04T01:40:56+5:302018-10-04T01:41:30+5:30
नीलम गोऱ्हे : कमिटीला बदनाम करण्यासाठीच चोरीचा प्रकार
लोणावळा : एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरणारे चोर हाती लागले असतानादेखील त्यांना समोर आणले जात नाही, असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी तपास यंत्रणेवर केला आहे. कार्ला गडावरील एकवीरा देवीच्या कळसचोरीच्या घटनेला वर्ष झाले, तरी कळस व कळसचोर न सापडल्याच्या निषेधार्थ कार्ला फाटा या ठिकाणी भाविकांच्या वतीने आज महाआरती करण्यात आली.
त्यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘कळस चोरांच्या हेतूविषयी शंका असून, मंदिर कमिटीला बदनाम करण्यासाठी ही चोरी झाली आहे. या घटनेचा तपास करणारे अधिकारी यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेज व पुरावे असतानादेखील चोरांना समोर आणले जात नाही. देवीची वक्रदृष्टी पडण्यापूर्वी चोरांना समोर आणा, जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची वाट पाहू नका.’’ अनंत तरे म्हणाले, की कार्ला गडावर देवीच्या कळस चोरीचे कटकारस्थान काही ग्रामस्थ व गावगुंडांनी केले आहे. तातडीने कळस व कळसचोर न सापडल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला. तसेच वन विभागाच्या जागेवर असलेले पायथा मंदिर शासनाने ताब्यात घ्यावे व देवीच्या पैशांची सुरू असलेली लूट थांबवावी, अशी मागणी केली. यावेळी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार अनंत तरे, शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, खासदार सुरेश टावरे, माजी आमदार प्रकाश भोईर, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, देवस्थानचे उपाध्यक्ष मदन भोई, खजिनदार नवनाथ देशमुख, विलास कुटे हे मान्यवर उपस्थित होते. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चोरीचा तपास सीआयडीकडे द्या
महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील एकवीरा देवी मंदिर कळस चोरीचा तपास सीआयडीकडे आहे. या प्रकरणातील कळसचोर सापडले असतानादेखील ते समोर आणले जात नसल्याने याप्रकरणी सीआयडीचे महासंचालक यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘एक महिन्यात चोर समोर न आणल्यास येत्या अधिवेशनात याविरोधात आवाज उठविण्यात येईल.’’ आया-बहिणींची सुरक्षा कोण करणार?
लाखो भाविकांचे रक्षण करणाऱ्या देवीच्या मंदिराचा कळस चोरी होऊन ती उघडकीस येत नसेल, तर या राज्यातील आया-बहिणींची सुरक्षा कोण करणार, असा प्रश्न उपस्थित करीत नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी केली.