कार्ल्यातील एकवीरा कळस चोरीच्या निषेधार्थ महाआरती; महिना उलटूनही लागेना तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:03 PM2017-11-04T13:03:07+5:302017-11-04T13:09:34+5:30
एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी होऊन महिना उलटला तरी चोरांचा शोध लागत नसल्याच्या निषेधार्थ कोळी, आगरी समाजाच्या वतीने एकवीरा देवीच्या मंदिरात महा आरती करण्यात आली.
लोणावळा : वेहेरगाव गडावरील कुलस्वामीनी एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरी होऊन महिना उलटला तरी चोरांचा शोध लागत नसल्याच्या निषेधार्थ कोळी, आगरी समाजाच्या वतीने एकवीरा देवीच्या मंदिरात महा आरती करण्यात आली.
या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत कोळी, आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील व श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे म्हणाले, पुढील महिनाभरात या चोरीचा छडा न लागल्यास महाराष्ट्रातील तमाम कोळी, आगरी व तत्सम समाज या घटनेच्या निषेधार्थ तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, या आंदोलनादरम्यान घडणार्या घटनांना मात्र त्या वेळी शासन व पोलीस प्रशासन जबाबदार असेल. आजची महाआरती हा समाजाचा आक्रोश असल्याचे जयेंद्र कुणे यांनी सांगितले.
श्री एकवीरा देवीच्या मंदिराच्या कळस चोरी प्रकरणाला आज एक महिना उलटला आहे. या प्रकरणाचा अद्याप कोणताही तपास लागलेला नाही. या चोरीच्या तपासाबाबत पाठपुरावा करण्याऐवजी वेहेरगावातील काही तथाकथित पुढारी व काही गावगुंडानी या कळस चोरीला राजकीय स्वरूप देऊन देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे व इतर काही विश्वस्तांना बेकायदेशीरपणे हटविण्याचा खोडसाळपणा केला आहे. महाआरतीनंतर गडावर या खोडसाळ कृत्याचा निषेध व्यक्त करत जमलेल्या नागरिकांनी गडावर नवीन विश्वस्तांनी लावलेले बोर्ड काढून टाकले.
महाआरतीला आगरी, कोळी समाजाचे अध्यक्ष राजाराम पाटील, योगेश कोळी, डी.एम. कोळी, जयेंद्र खुणे, जयवंती कोळी, किशोर भोईर, जयवंत पोकळे, संतोष चौधरी, छाया जाधव, अरविंद भोईर, मयूरेश कोटकर, शिरीष राजके, दत्ता भोईर, किसन फुलोरे आदींसह शेकडो कोळी, आगरी भाविक उपस्थित होते.
सदर बेकायदेशीर ट्रस्ट स्थापन करणार्यांवर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी. तसेच एका महिन्याच्या आत कळस व कळस चोराचा तपास लावावा. अन्यथा पुढच्या महिन्यात लाखो भाविक, कोळी, आगरी, कोळी एकवीरा गडावर व परिसरात तीव्र आंदोलन करतील़ त्यास पोलीस व प्रशासन जबाबदार राहील, असे तरे यांनी नमूद केले.