महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पिंपरीगावात बोगस मतदानाचा प्रयत्न फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 01:16 PM2019-10-21T13:16:02+5:302019-10-21T13:17:56+5:30
Pune election 2019 : सतर्कतेमुळेच पिंपरीगावातील विद्यानिकेतन शाळेत बोगस मतदान करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.
पिंपरी : पिंपरी राखीव मतदारसंघातील पिंपरीगाव येथील विद्यानिकेतन शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाला. मात्र मतदान कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत बोगस मतदानाचा प्रयत्न रोखला आहे.
पिंपरीगावातील विद्यानिकेतन शाळेतील मतदान केंद्रात सकाळी शांततेत मतदानाला सुरूवात झाली. याच केंद्रात बुथ क्रमांक ३०४ सखी मतदान केंद्र आहे. महिला अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांची या बुथवर नियुक्ती करण्यात आली आहे. पावसाच्या सावटाखाली मतदानाला सुरूवात झाली.
काही मतदारांचे ओळखपत्र तसेच नाव यात तफावत असल्याचे विद्यानिकेतन शाळेतील मतदान केंद्रावर मतदान अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशा मतदारांना मतदान करता आले नाही. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत अशा मतदारांना मतदान केंद्राबाहेर काढले. तसेच याबाबत पोलिसांना माहिती दिली.त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी या केंद्राला भेट दिली. तसेच पोलिसांचा बंदोबस्त वाढविला.
प्रत्येक उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी प्रत्येक बुथवर आहेत. मतदान करण्यासाठी आलेल्या मतदाराची ओळख त्यांच्याकडून पटविण्यात येत आहे. मतदान अधिकारी व कर्मचारी मतदाराचे नाव, ओळखपत्र पडताळून पाहत आहेत. त्यांच्या सतर्कतेमुळेच पिंपरीगावातील विद्यानिकेतन शाळेत बोगस मतदान करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. त्यामुळे बोगस मतदान झालेले नसून, मतदान प्रकिया सुरळीत असून, शांततेत मतदान होत आहे.
- वैशाली इंदाणी-उंटवाल, निवडणूक निर्णय अधिकारी, पिंपरी मतदारसंघ
पिंपरी गावातील विद्यानिकेतन शाळेतील मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. या केंद्राला भेट देऊन पाहणी केली आहे. मतदार शांततेत मतदान करीत आहेत.
- आर. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे)