Maharashtra election 2019 : पिंपरी मतदारसंघातील इच्छुकांनी नेले ४८ अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 06:33 PM2019-10-03T18:33:42+5:302019-10-03T18:34:26+5:30
विधानसभा निवडणूक : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस..
पिंपरी : उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असताना गुरुवारी (दि. ३) पिंपरी मतदारसंघातील १७ इच्छुकांनी ४८ उमेदवारी अर्ज नेले. यात अपक्ष म्हणून २१ अर्ज इच्छुकांनी घेतले. शुक्रवारी (दि. ४) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे यातील किती उमेदवार अर्ज दाखल करतील याबाबत उत्सुकता आहे.
पिंपरी मतदारसंघाचे निवडणूक विषयक कामकाज निगडी प्राधिकरणातील हेडगेवार भवन येथून होत आहे. नामनिर्देशन पत्र वितरण व स्वीकृतीही येथूनच होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैशाली इंदाणी-उंटवाल नामनिर्देशन पत्र स्वीकारत आहेत.
निवडणुकीच्या अधिसूचना शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी जारी झाली. तेव्हापासून गुरुवारपर्यंत २२३ अर्जांचे वितरण झाले आहे. शिवसेनेकडून अॅड. गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच त्यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखलही केला. असे असतानाही शिवसेनेतील इच्छुकांनी शिवसेनेकडून लढण्यासाठी उमेदवारी अर्ज नेले आहेत. वंचित बहुजन आघाडी तसेच एमआयएम पक्षातील इच्छुकांनीही अर्ज नेले. राष्ट्रवादीकडूनही गुरुवारी उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. तरीही इच्छुकांनी राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी गुरुवारी अर्ज घेतले. त्यामुळे शिवसेना तसेच राष्ट्रवादीतील इच्छुक शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करीत बंडखोरी करण्याची शक्यता आहे.