Maharashtra election 2019: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा उमेदवारांत जल्लोष , तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा हिरमोड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 05:40 PM2019-10-03T17:40:42+5:302019-10-03T17:41:42+5:30
अर्ज दाखल करण्यास दोन दिवस शिल्लक राहिले असताना भाजपात गुरुवारी शक्तिप्रदर्शन तर राष्ट्रवादी हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पिंपरी : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवस शिल्लक राहिले असताना भाजपात गुरुवारी शक्तिप्रदर्शन तर राष्ट्रवादी हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. केवळ 50 ते साठ कार्यकर्तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या रॅलीत होते तर भाजपने मोठ्या प्रमाणात रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मतदारसंघात पदयात्रा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले
जगताप यांनी ग्रामदैवत भैरवनाथ व जुनी सांगवीतील गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर सकाळी दहा वाजता सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरूवात केली. पदयात्रेच्या सुरूवातीलाच धनगर बांधवांनी अहिल्यादेवी पुतळा परिसरात सादर झालेले गजीनृत्य,महिलांनी केलेली फुलांची उधळण यांसह जोरदार वातावरणनिर्मिती केलीपुढे ढोरेनगर, शितोळेनगर, बॅक ऑफ महाराष्ट्र, साई चौक, कृष्णा चौक, काटेपुरम चौक, पिंपळेगुरव, सृष्टी चौक, वैदुवस्ती, सुदर्शन चौक, स्वराज गार्डन, पिंपळे सौदागर येथील काटे चौक, पिंपळे सौदागर गावठाण, रहाटणी, काळेवाडी, तापकीर चौकमार्गे थेरगाव येथील बापुजी बुवा मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिरात दर्शन घेतले. पुढे चापेकर चौकातील क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी पदयात्रेचा समारोप केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचा हिरमोड
पिंपरी: उमेदवारी अर्ज दाखल करायच्या पाच मिनिटं अगोदर पोहोचल्याने लिफ्टमध्ये अडकल्याने उमेदवारी अर्ज भरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस चा मुहूर्त हुकला आहे. चिंचवड विधानसभा निवडणूक साठी दुपारी माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सर्व नेते प्राधिकरणाच्या कार्यालयात दाखल झाले पण कार्यालय सातव्या मजल्यावर असल्याने अर्ज भरण्याची मुदत संपली. त्यामुळे अर्ज न भरताच उमेदवारांना परतावे लागले. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, महिला अध्यक्ष वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, फजल शेख आदी उपस्थित होते.