Maharashtra Election 2019: पक्षाचा शिक्काच नको; पिंपरी-चिंचवड आमदारकीचा 'अपक्ष' पॅटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 07:11 PM2019-10-12T19:11:30+5:302019-10-12T19:13:17+5:30
आताच्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाची उमेदवारी नाकारत इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी घेण्यास प्राधान्य दिले.
विधानसभा निवडणूक : सर्वपक्षीयांनी पुरस्कृत करण्याची नवी पद्धत सुरू
>> हणमंत पाटील
पिंपरी : गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीपासून उद्योगनगरीतील चिंचवड व भोसरी मतदारसंघात अपक्ष उमेदवारी घेऊन विजयी होण्याचा नवा पॅटर्न उदयास आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात आताच्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाची उमेदवारी नाकारत इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी घेण्यास प्राधान्य दिले. शिवाय पुरस्कृत म्हणून पाठिंबा घेण्याचीही नवी पद्धत सुरू झाली आहे. या विधानसभा निवडणुकीत या पॅटर्नची हॅट्ट्रिक होणार की त्याला ब्रेक लागणार याविषयी उत्सुकता आहे.
निवडणूक आयोगाने २००९ साली केलेल्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये औद्योगिकनगरीत पिंपरी, चिंचवड व भोसरी असे स्वतंत्र तीन मतदारसंघ तयार झाले. त्या वेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्यामुळे शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतून इच्छुकांची भाऊगर्दी होती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींना सर्वांना न्याय देता येत नव्हता. त्यामुळे ‘पक्षाचा अधिकृत व अपक्ष उमेदवार, यापैकी जो निवडून येईल, तो आपला,’ अशी राजनीती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सुरू केली होती.
.....
चिंचवडमध्येही राष्ट्रवादीची ‘पुरस्कृत’ खेळी
विधानसभा २००९ च्या निवडणुकीत आघाडीच्या जागा वाटपात चिंचवड काँग्रेसकडे आणि भोसरी मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. चिंचवड मतदारसंघात काँग्रेसने तत्कालीन शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांना अधिकृत उमेदवारी दिली. त्या वेळी विधान परिषदेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आघाडीच्या उमेदवाराविरोधात विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून विजय मिळविला. त्या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचीच जगताप यांच्या अपक्ष उमेदवारीसाठी फूस असल्याची चर्चा होती. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत आमदार जगताप यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. ते भाजपाच्या तिकिटावर निवडूनही आल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला. सलग दोनवेळा विधानसभेवर निवडून आल्याने आमदार जगताप यांना या निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक करायची आहे. मात्र, त्यांच्या विजयाचा वारू रोखण्यासाठी चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अपक्ष उमेदवारीला पुरस्कृत करण्याची खेळी करण्यात आली आहे. शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते राहुल कलाटे यांनी महायुतीतून बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यांना राष्ट्रवादीकडून पुरस्कृत करण्यात आल्याने त्यामागे आमदार जगताप यांना रोखण्याची अजित पवार यांची खेळी असल्याची चर्चा आहे.
......
भोसरीत ‘अपक्ष’ पॅटर्नची हॅटट्रिक की ब्रेक
भोसरी मतदारसंघातून राष्ट्रवादीने २००९ च्या निवडणुकीत माजी महापौर मंगला कदम यांना उमेदवारी दिली होती. त्या वेळी राष्ट्रवादीचे हवेली मतदारसंघाचे तत्कालीन आमदार विलास लांडे यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मदतीने ते अपक्ष म्हणून भोसरीतून निवडून आले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. भोसरी मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत विद्यमान आमदार विलास लांडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्याविरोधात राष्ट्रवादीचे तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष महेश लांडगे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी जाहीर केली. २००९ च्या निवडणुकीत विलास लांडे यांना अपक्ष म्हणून पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे दत्ता साने यांच्यासह काही नगरसेवकांनी २०१४ च्या निवडणुकीत भूमिका बदलली. विलास लांडे यांच्याऐवजी अपक्ष म्हणून बंडखोरी केलेल्या महेश लांडगे यांना पाठिंबा देत निवडून आणले. त्यामुळे ‘अपक्ष’ उमेदवारी लकी असल्याच्या श्रद्धेने व सर्वपक्षीय पाठिंबा मिळण्याच्या आशेने २०१९ च्या निवडणुकीत विलास लांडे यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका आता स्थानिक व मतदारसंघातील प्रश्नांऐवजी राष्ट्रीय प्रश्नांवर लढविल्या जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भोसरीतील अपक्ष पॅटर्नची हॅट्ट्रिक होणार की भाजपाचे महेश लांडगे त्याला ब्रेक लावणार, याविषयी मतदारांमध्ये उत्सुकता आहे.
.....
असा आहे अपक्ष पॅटर्न...
पिंपरी-चिंचवड शहरातील दोन मतदारसंघात गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी अपक्ष उमेदवाराला कौल दिला आहे. कोणत्याही पक्षाची उमेदवारी स्वीकारली, तर पक्षाअंतर्गत नाराजी व बंडखोरीला सामोरे जावे लागते. त्याऐवजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, तर सर्व पक्षातील नाराजांची मदत मिळवून निवडून येता येते. हे मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत घडून आल्याने इच्छुक उमेदवारांनी अपक्ष उमेदवारीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतही भोसरी व चिंचवड मतदारसंघात विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही पुन्हा एकदा अपक्ष उमेदवारीची खेळी खेळली आहे.