Maharashtra election 2019 : पिंपरीत युतीसह आघाडीत बंडखोरी ठरणार डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 06:47 PM2019-10-03T18:47:04+5:302019-10-03T18:53:42+5:30
'' बंडोबां''च्या भूमिकेकडे लक्ष्य...
पिंपरी : राखीव असलेल्या पिंपरी मतदारसंघात महायुतीसह महाआघाडीच्या बंडखोरांनी गुरुवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज दाखल केले. रॅली काढून शक्तिप्रदर्शन करीत निगडी प्राधिकरणातील हेडगेवार भवन येथे गुरुवारपर्यंत सात उमेदवारांनी १३ नामनिर्देशन पत्र दाखल केले. शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि. ४) आणखी काही नाराजांकडून अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. असे असले तरी अर्ज माघारीनंतरच या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्याकडूनही पिंपरीच्या जागेची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून ह्यशब्दह्ण घेण्यात आला होता. तसेच भाजपाकडूनही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यास प्रतिसादही मिळाला. मात्र विद्यमान आमदार शिवसेनेचा असल्याने ही जागा शिवसेनेकडे गेली. त्यामुळे आरपीआय तसेच भाजपातील इच्छुकांचा हिरमोड झाला. जोरदार तयारी केली असताना तसेच ''शब्द'' दिला असतानाही जागा सोडण्यात आली नाही म्हणून इच्छुकांनी नाराजी व्यक्त करीत बंडाचे निशाण फडकावले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी समितीचे सदस्य अमित गोरखे भाजपाकडून इच्छुक होते. त्यांनीही भाजपाकडून तसेच अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
महाआघाडीत ही जागा राष्ट्रवादीला मिळाली आहे. असे असतानाही काँग्रेसकडून इच्छुक असलेले सुंदर कांबळे यांनी अपक्ष तसेच काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यामुळे आघाडीतही बंडाळी झाल्याचे दिसून आले. शिवसेनेतर्फे विद्यमान आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. विजय हनुमंत रंदिल यांनीही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
'' बंडोबां''च्या भूमिकेकडे लक्ष्य
पिंपरी मतदारसंघात इच्छुकांची मोठी संख्या आहे. पक्षश्रेष्ठी तसेच नेत्यांकडून मनधरणी करण्यात येऊन त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. असे असले तरी काही उमेदवार बंडखोरी करीत निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे दिसून येते. शनिवारी (दि. ५) उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, सोमवारी (दि. ७) उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहेत. त्यानंतरच पिंपरी मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून, बंडखोर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष्य लागून आहे.