Maharashtra Election 2019 : मावळच्या गतिमान विकासासाठी माघार : रवी भेगडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 01:16 PM2019-10-07T13:16:47+5:302019-10-07T13:20:48+5:30
बंडखोरी रोखण्यात भाजपाला यश..
लोणावळा : मावळात भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी केलेली बंडखोरी रोखण्यात राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह पक्षश्रेष्ठींना यश आले आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारी मागे घेत सोमवारी त्यांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार बाळा भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
मावळभाजपामधून विधानसभेची उमेदवारी मिळविण्याकरिता राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह भाजयुमोचे माजी अध्यक्ष रवींद्र भेगडे व नगरसेवक सुनील शेळके यांनी फिल्डिंग लावली होती. मात्र, विकासकामांच्या जोरावर उमेदवारी मिळविण्यात बाळा भेगडे यांनी बाजी मारली. यामुळे सुनील शेळके नाराज झाले. राष्ट्रवादीने शेळके यांना उमेदवारी दिली. मात्र, भाजपचे एकनिष्ठ असलेले रवींद्र भेगडे यांनी बंडखोरी न करता अपक्ष अर्ज दाखल करून नाराजी व्यक्त केली होती.
..............
राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह मावळातील ज्येष्ठ नेतेमंडळी रवींद्र भेगडे यांची नाराजी दूर करण्यात रविवारी यश आले आहे. त्यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारीला पाठिंबा देण्याची जाहीर घोषणा रवींद्र भेगडे यांच्याकडून सोमवारी सकाळी करण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले. मावळ तालुक्यात भाजपाचे मजबूत संघटन आहे. येथे व्यक्तीपेक्षा पक्षाला मानणारा वर्ग असल्याने कार्यकर्ता ही भाजपची ताकद आहे. नुकतेच खासदार श्रीरंग बारणे व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाºयांनी बाळा भेगडे यांची भेट घेत युतीचा धर्म पाळण्याचे आश्वासन दिले आहे. भेगडे यांनी निवडणुकीत हॅट्ट्रिक केल्यास त्यांना कॅबिनेटमंत्री पदाची संधी मावळला मिळणार असल्याची चर्चा भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
महाराष्ट्राचे रोड माॅडल म्हणून मावळ तालुका पुढे येत असताना या गतिमान विकासाला साथ देण्याकरिता तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीला मान देत मावळ विधानसभेकरिता अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपाचे अधिकृत उमेदवार बाळा भेगडे यांना साथ देण्याचे रवींद्र भेगडे यांनी पाठिंबा जाहीर केला.
यावेळी रवींद्र भेगडे यांची बाळा भेगडे यांच्या प्रचारप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केली.
रवींद्र भेगडे म्हणाले की, मावळ विधानसभा निवडणूक लढविण्याकरिता मी इच्छुक होतो, उमेदवारी मिळविण्याकरिता प्रयत्न केले. गावभेट दौरा व संघटना बांधणीकरिता काम केले मात्र पक्षाने राज्यमंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी दिली. उमेदवारी न मिळाल्याने पक्षावर नाराजी व्यक्त करत मी अपक्ष अर्ज दाखल केला होता मात्र अखेर मी भाजपाच्या व संघाच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता असल्याने पक्ष शिस्तीला बांधिल राहून मी समर्थक कार्यकर्ते व नातेवाईक यांच्याशी चर्चा करुन निवडणुक न लढविता राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे जाहिर केले. पुढील पंधरा दिवस भाजपाचा उमेदवार विजयी करण्याकरिता सर्वशक्तीनिशी प्रचार प्रक्रियेत सहभाग घेणार असल्याचे स्पष्ट केले.
कोणतीही अपेक्षा न ठेवता बिनशर्तपणे हा पाठिंबा जाहीर केला असल्याचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सांगितले. तसेच मावळ विधानसभेच्या प्रचारप्रमुख पदी रविंद्र भेगडे यांची निवड सर्वानुमते जाहिर करण्यात आली.
या पत्रकार परिषदेला राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शंकरराव शेलार भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, रिपाईचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, संतोष दाभाडे, एकनाथ टिळे, कमलशील म्हस्के, शरद हुलावळे, सुरेश गायकवाड, रघुवीर शेलार उपस्थित होते.