महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची पीछेहाट; राष्ट्रवादीचे जोरदार कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 04:26 PM2019-10-24T16:26:37+5:302019-10-24T17:03:15+5:30
Winning Candidates In Pune Vidhan Sabha Election 2019: भाजपाचे लक्ष्मण जगताप, महेश लांडगे , राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे, सुनील शेळके विजयी
पिंपरी : उद्योगनगरीतील एकहाती सत्ता असतानाही पिंपरी व मावळ मतदारसंघातील भाजपा व शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. मावळातभाजपाचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा सुनील शेळके यांनी आणि पिंपरीत शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी पराभव केला. मात्र, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीतील आमदार महेश लांडगे या भाजपाच्या दोन पहिलवानांनी बाजी मारली.
औद्योगिकपट्यातील पिंपरी, भोसरी, चिंचवड व मावळ या चारही विधानसभा मतदारसंघात एकास एक अशी चुरशीची लढत झाली. पिंपरी-चिंचवड महापालिका व मावळातील नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे युतीकडून चारही जागा विजयी होण्याचा दावा करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर उद्योगनगरीत भाजपाच्या पहिलवानांपुढे लढण्यासाठी कोणी विरोधकच नसल्याची टीका केली होती. मात्र, मावळ व पिंपरी या दोन्ही हक्काच्या जागा महायुतीने गमावल्या आहेत.