वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्र जिवंत
By admin | Published: April 29, 2017 04:05 AM2017-04-29T04:05:01+5:302017-04-29T04:05:01+5:30
जोपर्यंत वारकरी संप्रदाय जिवंत आहे, तोपर्यंत महाराष्ट्र जिवंत राहील, असे प्रतिपादन भारूडसम्राट हभप लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी
पिंपरी : जोपर्यंत वारकरी संप्रदाय जिवंत आहे, तोपर्यंत महाराष्ट्र जिवंत राहील, असे प्रतिपादन भारूडसम्राट हभप लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी काळभोरनगर, चिंचवड येथे केले. पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत तीन दिवसीय सुबोध व्याख्यानमालेत ‘मानवी जीवनाचे सत्य’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना लक्ष्मणमहाराज बोलत होते.
या प्रसंगी नगरसेवक जावेद शेख, नगरसेविका वैशाली काळभोर, माजी नगरसेवक मारुती भापकर, शंकर पांढरकर, दामोदर येवले, कवी अशोक कोठारी, अरविंद वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य संयोजक शंकर काळभोर यांनी प्रास्ताविकातून व्याख्यानमालेच्या पंधरा वर्षे वाटचालीची माहिती दिली.
राजगुरू म्हणाले, ‘‘आज समाजाला संतविचारांची अत्यंत गरज आहे. चौऱ्याऐंशी लक्ष योनींनंतर अतिशय दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त होतो; परंतु आयुष्याचा एक क्षणही समाज, देश आणि अध्यात्माकरिता खर्च न करता माणूस जन्म वाया घालवतो. नाशवंत प्रपंचाची ओढ मरणघटिका जवळ आली तरी कमी होत नाही. प्रपंचात राहूनदेखील नरदेहाचे सार्थक करता येते; परंतु दिवसेंदिवस घराघरांतील संस्कृती बिघडत चालली आहे. व्यसन हीच तरुणांची फॅशन झाली आहे. व्यसनाधीनतेने स्वत:चे आणि पर्यायाने देशाचे नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)