संरक्षण सामग्री निर्मितीत महाराष्ट्र अग्रणी : देवेंद्र फडणवीस

By प्रकाश गायकर | Published: February 24, 2024 08:26 PM2024-02-24T20:26:05+5:302024-02-24T20:27:44+5:30

‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’ चे उदघाटन : महाप्रदर्शनात डिफेन्स एम एस एम ई कंपन्यांचा सहभाग

maharashtra pioneer in defence material manufacturing said devendra fadnavis | संरक्षण सामग्री निर्मितीत महाराष्ट्र अग्रणी : देवेंद्र फडणवीस

संरक्षण सामग्री निर्मितीत महाराष्ट्र अग्रणी : देवेंद्र फडणवीस

प्रकाश गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी : पुणे येथे संरक्षण सामग्री निर्मितीची चांगली परिसंस्था निर्माण झाली आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी आहे. अनेक संरक्षण विषयक संस्था राज्यात आहेत. तीस टक्के दारुगोळा महाराष्ट्रात तयार होतो. सन २०१७ साली एअरोस्पेस, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. त्यामुळे महाराष्ट्राचा देशात मान वाढला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४’चे आयोजन शनिवार (दि.२४) ते सोमवार (दि. २६) दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाकडून पिंपरी चिंचवड येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर (मोशी) येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि.२४) झाले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, डॉ. बिपीन शर्मा, लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंग, एयर मार्शल विभास पांडे, ‘निबे लिमिटेड’चे अध्यक्ष आणि प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर गणेश निबे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप तसेच संरक्षण दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डिफेन्स एमएसएमई क्षेत्रातील मॅक्स एरोस्पेस, निबे लिमिटेड या कंपन्यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारशी निर्मितीसंदर्भात करार केले. 

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची ताकद ओळखली. स्वतःची संरक्षण सामग्री स्वतः देशात निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा देश मजबूत देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. भारताला आता तंत्रज्ञान दिले जाऊ लागले आहे. लाखो कोटींची बचत होऊन रोजगार निर्मिती झाली आहे. एमएसएमई क्षेत्रानेही चांगले काम करून दाखवले. सप्लाय चेनवर भर देऊन चार डिफेन्स क्लस्टर तयार केले जाणार आहेत. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल आणि रोजगार निर्मिती होणार आहे.”  

डॉ. हर्षदीप कांबळे यांनी प्रास्ताविक केले. ‘निबे लिमिटेड’चे अध्यक्ष आणि प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर गणेश निबे यांनी आभार मानले. मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले.

राज्यात चार ठिकाणी डिफेन्स हब : सामंत 

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “राज्यात चार ठिकाणी डिफेन्स हब निर्माण करण्यात येणार आहे. या उद्योगांच्या मागणीनुसार एक हजार एकर जागा त्यांना देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेण्यात आला आहे. या उद्योगांना प्राधान्य आणि इन्सेन्टिव्ह मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. डिफेन्स एमएसएमई क्षेत्रातील निबे लिमिटेड या कंपन्यांनी घेतलेल्या पुढाकाराने हे महाप्रदर्शन प्रत्यक्षात आले आहे.”
--

Web Title: maharashtra pioneer in defence material manufacturing said devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.