Police | तृतीयपंथीही होणार पोलीस; भरती प्रक्रियेत सामावून घेण्याचे ‘मॅट’चे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 09:06 PM2022-11-30T21:06:00+5:302022-11-30T21:09:40+5:30
४ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देऊन तृतीयपंथींना भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात यावे...
पिंपरी : राज्यात पोलीस भरती होत आहे. यात सर्वच घटकांना आरक्षण तसेच विविध माध्यमातून सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासह आता तृतीयपंथींना देखील या भरतीमध्ये अर्ज करता येणार आहे. त्यासाठी ४ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देऊन तृतीयपंथींना भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात यावे, असा आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांच्याकडून मंगळवारी (दि. २९) आदेश देण्यात आले आहेत.
ट्रान्सजेंडर यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण पोलीस भरतीमध्ये नाही. त्यामुळे पोलीस भरतीमध्ये लैंगिकतेवरून भेदभाव होत असल्याचा आरोप तृतीयपंथींनी केला. पिंपरी-चिंचवड येथील तृतीयपंथी निकिता मुख्यदल यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इ-मेलद्वारे निवेदन दिले. निकिता या ‘ट्रान्स’ महिला आहेत. पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या सुरक्षा विभागात सुरक्षारक्षक म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच सध्या त्यांच्यासह इतर तृतीयपंथी देखील पोलीस भरतीसाठी सराव करीत आहेत. यंदा होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये ‘ट्रान्सजेंडर’साठी आरक्षण राहील, अशी तृतीयपंथींना अपेक्षा होती. पण पोलीस भरतीमध्ये आरक्षण नाही. तृतीयपंथींना टाळून त्यांच्यावर अन्याय का? पोलीस भरतीची सर्व पूर्व तयारी केली असूनही संधीच दिली नाही तर स्वत:ला सिध्द करायचे कसे? नोकरी करण्यासाठी लिंग महत्वाचे आहे की, काॅलिफिकेशन आणी टॅलेंट महत्वाचे आहे, असे प्रश्न निकिता मुख्यदल यांनी उपस्थित केले.
तृतीयपंथींसाठी महिला उमेदवारांचे निकष
निकिता मुख्यदल यांनी ‘मॅट’कडे धाव घेतली. मॅटने त्यांची दखल घेत आदेश दिले आहेत. भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्यासाठी तृतीयपंथींसाठी स्वतंत्र काॅलम उपलब्ध करून द्यावा. तसेच भरतीसाठी महिला उमेदवारांना असलेले निकष त्यांच्यासाठी असावेत, असेही मॅटने आदेशात नमूद केले आहे.
झारखंड आणि कर्नाटकमध्ये ट्रान्सजेंडर पोलीस आहेत. मग महाराष्ट्रातच का नको? पिंपरी- चिंचवड महापालिकेनेही तॄतीयपंथींना नोकरीची संधी दिली आहे. पोलीस भरतीमध्ये ‘ट्रान्सजेंडर’ला संधी न देता त्यांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. लैंगिक भेदभाव टाळण्यासाठी ट्रान्सजेंडर यांनाही पोलीस भरतीमध्ये संधी द्यावी, अशी मागणी आमची मागणी आहे. ‘मॅट’ने आदेश दिल्याने पोलीस होण्याचे तृतीयपंथींचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आम्हालाही देशाचे नागरिक म्हणून सन्मानने देशसेवा करता येणार आहे.
- निकिता मुख्यदल, ट्रान्सजेंडर, पिंपरी-चिंचवड