...अन् गांधीजी अवतरले चिंचवड रेल्वेस्थानकावर! 'चले जाव' च्या आठवणींना मिळाला उजाळा
By विश्वास मोरे | Updated: August 9, 2024 17:05 IST2024-08-09T17:05:04+5:302024-08-09T17:05:23+5:30
गांधीजींना ९ ऑगस्ट १९४२ ला पुण्यातील येरवडा कारागृहात आणले जात होते. परंतु जनक्षोभ उसळू नये, म्हणून चिंचवड रेल्वेस्थानकावर उतरले होते

...अन् गांधीजी अवतरले चिंचवड रेल्वेस्थानकावर! 'चले जाव' च्या आठवणींना मिळाला उजाळा
पिंपरी : स्वातंत्र्यलढ्यात ऑगस्ट क्रांतिदिनास महत्व आहे. शुक्रवारी आज दुपारी मुंबईहून येणार्या रेल्वेतून ब्रिटिश अधिकार्यासमवेत चिंचवड रेल्वेस्थानकावर चक्क महात्मा गांधीजी उतरले अन् त्यांच्या जयघोषाच्या जल्लोषाने प्रवासीही चकित झाले. ९ ऑगस्ट १९४२ ला चिंचवड स्थानकावर महात्मा गांधी काही काळ थांबले होते. या घटनेचा पुनर्प्रत्येय आला. आठवणींना उजाळा मिळाला.
महात्मा गांधी यांनी 'चले जाव' आंदोलन पुकारल्यामुळे त्यांना अटक झाली. दिनांक ९ ऑगस्ट १९४२ ला पुण्यातील येरवडा कारागृहात आणले जात होते. परंतु जनक्षोभ उसळू नये, म्हणून चिंचवड रेल्वेस्थानकावर त्यांना उतरले होते. या घटनेची आठवण शब्दधन काव्यमंचाने या प्रसंगाचे अभिरूपदर्शन घडवून आणले. तसेच रेल्वेस्थानकावर महात्मा गांधी विचारजागर या ऐतिहासिक कविसंमेलन घेण्यात आले.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पी. एस. आगरवाल महात्मा गांधींच्या आणि सुभाष चव्हाण इंग्रज अधिकार्याच्या वेशभूषेत सहभागी झाले होते; तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहसंयोजक प्रकाश क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, उपाध्यक्ष मुकेश चुडासामा, चिंचवड रेल्वेस्थानक प्रबंधक मॅथ्यू जॉर्ज, ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, अशोकमहाराज गोरे, राजेंद्र घावटे, कैलास भैरट, प्रकाश घोरपडे, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती.
बालकवयित्री सानिका जोशीपासून ते ज्येष्ठ कवयित्री राधाबाई वाघमारे यांच्यापर्यंत सुमारे तीस कवींनी आपल्या देशभक्तिपर रचनांनी वीरश्रीपूर्ण वातावरणनिर्मिती केली होती. यामध्ये शोभा जोशी, अरुण कांबळे, सीमा गांधी, बाळकृष्ण अमृतकर, शामला पंडित, आय. के. शेख, अण्णा जोगदंड, अण्णा गुरव, योगिता कोठेकर, शामराव सरकाळे, आत्माराम हारे, रशिद अत्तार, जयवंत पवार यांच्या रचना उल्लेखनीय होत्या. कविवर्य रघुनाथ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे देशभक्तिपर घोषणा दिल्या. नामदेव हुले, आनंद मुळूक, राजू जाधव, फुलवती जगताप, शरद काणेकर, राजेंद्र पगारे, सुंदर मिसळे, काळुराम सांडगे यांनी संयोजन केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी एकोंडे यांनी आभार मानले. वंदेमातरमने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.