पिंपरी-चिंचवड मधील महात्मा फुले शाळा स्थलांतराला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:07 PM2018-06-20T14:07:00+5:302018-06-20T14:07:00+5:30
प्रेमलोक पार्क येथील महापालिकेची महात्मा फुले शाळा स्थलांतरीत करून ही इमारत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भाडेतत्वावर देण्यात आली आहे.
पिंपरी : विद्यार्थ्यांना वा-यावर सोडून महापालिकेने चिंचवड प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेची इमारती नियोजित पोलीस आयुक्तालयासाठी भाड्याने दिली आहे. त्यामुळे पालिकेने शाळेला सील ठोकले. या शाळा स्थलांतराला विरोध करण्यासाठी पालिका मुख्यालयासमोर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गात ठिय्या मांडत आंदोलन केले. सध्या महापालिकेसमोरच शाळा सुरु आहे.
या शाळा स्थलांतराविरुद्ध पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, योगेश बाबर, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका शितल काटे, उषा वाघेरे, विनया तापकीर, संगीता ताम्हाणे, डॉ. वैशाली घोडेकर, नगरसेवक नाना काटे, छावा क्रांतीवर सेनेचे राजेंद्र पडवळ, हे आंदोलनात सहभागी झाले आहेत.
प्रेमलोक पार्क येथील महापालिकेची महात्मा फुले शाळा स्थलांतरीत करून ही इमारत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भाडेतत्वावर देण्यात आली आहे. शाळेतील साहित्य देखील हलविण्यात आले आहे. परंतु, याला विद्यार्थ्यांसह पालकांचा तीव्र विरोध आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलकांच्या भूमिकेत आहे.परंतु,त्यांच्या मागणीकडे सत्ताधारी आणि प्रशासनाने दुर्लक्ष करत ही शाळा दळवीनगर येथील रेल्वे लाईन परिसरातील असलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. येथे दिवसभर रेल्वेच्या आवाजाचा सुरु असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत लक्ष लागणार नाही, असे पालकांचे मत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयासाठी सरकारने विद्यार्थ्यांना वा-यावर सोडू नये. महात्मा फुले शाळेत वर्ग सुरू ठेवावेत, अशी आग्रही मागणी पालकांची आहे.