'लाईट बिल दुरुस्ती' च्या कारणावरून महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण, गुन्हा दाखल
By admin | Published: January 16, 2017 08:52 PM2017-01-16T20:52:43+5:302017-01-16T20:52:43+5:30
- लाईट बिल दुरुस्तीच्या कारणावरून चाकण येथील महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यास बेदम मारहाण केल्याप्रकरणी
ऑनलाइन लोकमत
चाकण,दि. 16 - लाईट बिल दुरुस्तीच्या कारणावरून चाकण येथील महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यास बेदम मारहाण केल्याप्रकरणी मोई ( ता.खेड ) येथील एका व्यक्तिवर कलम ३५३ अन्वये चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना आज ( दि. १६ ) सकाळी साडे अकराच्या सुमारास चाकण येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात घडली. दिनेश गवारे ( रा. मोई, ता.खेड, जि. पुणे ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गवारे याने लाईट बिल दुरुस्तीच्या कारणावरून महावितरण कार्यालयात घुसून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या टेबलावरील पेपर ट्रे व कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून दिली. असे का करतो? असे विचारले असता गवारे याने फिर्यादी व महावितरणचे कनिष्ठ अभियंता रोहन रमेश शिंगाडे ( वय २७, रा. सर्व्हे नं. १२, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे ) यांना बेदम मारहाण केली. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे अधिक तपास करीत आहेत.