भोसरीत महावितरणचा लाच घेणारा सहाय्यक अभियंता पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 08:25 PM2018-05-10T20:25:34+5:302018-05-10T20:25:34+5:30
विद्युत कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी खाजगी इसमामार्फत दहा हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
भोसरी: वर्क्सशॉपसाठी घेतलेल्या गाळ्यासाठी थ्री फेज कनेक्शनमध्ये नवीन विद्युत जोडणीसाठी अर्ज केला होता. सदरचे विद्युत कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी खाजगी इसमामार्फत दहा हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भोसरीतील महावितरणच्या कार्यालयाशेजारी करण्यात आली. रोहित अशोक डामसे (वय ३१,सहायक अभियंता,रा.मयूरनगरी, फेज ३ पिंपळे गुरव ) व आशिष जगन्नाथ देसाई (वय ३३. रा. देवकर पॅलेस,भोसरी)असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डामसे यांनी तक्रारदारांकडे हे वीज कनेक्शन मंजूर करण्यासाठी एकूण ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १० हजार रुपये स्विकारताना ही कारवाई केली. तक्रारदार हे एक्स सर्व्हिस मेन आहेत. त्यांनी एक्स सर्विसमेन कॉपोर्रेशन लिमिटेड, मध्ये व्यवसायच्या वर्क्सशॉपसाठी गाळा घेतला आहे. सदर गाळ्यासाठी थ्री फेज कनेक्शनमध्ये नवीन विद्युत जोडणीसाठी अर्ज केला होता. सदरचे कनेक्शन मंजूर करून देण्यासाठी खाजगी इसम देसाई याने लोकसेवक डामसे याच्यासाठी ३५,००० लाचेची मागणी करून लोकसेवक डामसे व स्वत:साठी पहिला हफ्ता १०,०००/- रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे व जालिंदर तांदळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.