Maharashtra Assembly Election 2024: ‘मायक्रो प्लॅनिंग’, तगडे उमेदवार, लाडकी बहीण; पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचं राज्य, आघाडी चुकली कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 06:02 PM2024-11-24T18:02:27+5:302024-11-24T18:03:48+5:30
Maharashtra Assembly Election 2024 पक्षफुटीनंतर लोकसभेवेळी शरद पवार पक्षाला मिळालेली सहानुभूती आताही मिळेल, असे सांगितले जात असताना निकालावरून ते सपशेल खोटे ठरले
पिंपरी: वर्षभरापासूनची तयारी, बलाढ्य यंत्रणेचे ‘मायक्रो प्लॅनिंग’, अनुभवी आणि तगडे उमेदवार, लाडकी बहीणसारख्या योजनांचे आणि राज्य सरकारच्या ताकदीचे भक्कम पाठबळ या जोरावर पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही जागांसह शेजारच्या मावळवर एकहाती हुकूमत ठेवण्यात महायुतीला पुन्हा यश आले. चारपैकी प्रत्येकी दोन जागा भाजप आणि अजित पवार गटाने लिलया खिशात घालत उद्योग पट्ट्यासह महापालिका क्षेत्रावरील पकड कायम ठेवली आहे. शहरातील तिन्ही जागा लढविणाऱ्या आणि मावळातील अपक्षाला पाठिंबा देणाऱ्या शरद पवार गटाचे पानिपत झाले.
विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी हाती आले. उद्योग नगरीला ते अपेक्षितच होते. भोसरी, पिंपरी आणि मावळमध्ये ‘अंडरकरंट’ जाणवत होता. प्रस्थापितांविरोधात काहीशी नैसर्गिक नाराजीही होती. पक्षफुटीनंतर लोकसभेवेळी शरद पवार पक्षाला मिळालेली सहानुभूती आताही मिळेल, असे महाविकास आघाडीकडून सांगितले जात होते. त्यावर अंदाज बांधले जात होते. पण निकालाच्या आकड्यांवरून ते सपशेल खोटे ठरले.
महायुतीने अशा रचल्या चाली...
भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीची तयारी वर्षभरापासूनच सुरू केली होती. विद्यमान आमदार ज्याचा असेल, त्याला ती जागा देण्याच्या सूत्रानुसार भोसरी आणि चिंचवड भाजपला, तर पिंपरी आणि मावळ अजित पवार गटाला देण्याचे ठरले होते. त्यात मावळमध्ये भाजपने विरोध केला, पण ती जागा अजित पवार गटाला गेली आणि अपेक्षेनुसार सुनील शेळके यांनाच पुन्हा संधी मिळाली. पिंपरीत अण्णा बनसोडेंना पक्षातूनच विरोध होता. मात्र, अजित पवारांनी त्यांचीच पाठराखण केली. भोसरीतून भाजपने महेश लांडगे यांचे तिकीट आधीच निश्चित केले होते, तर २०२३ च्या पोटनिवडणुकीपासून पद्धतशीर पावले टाकणाऱ्या शंकर जगताप यांना चिंचवडमधून रिंगणात उतरविण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले होते. त्यासाठी जगताप यांच्या भावजय आमदार अश्विनी जगताप यांना थांबविण्यात आले. लोकसभेवेळी असलेली विरोधाची तीव्रता कमी झाल्याचे दिसताच महायुती आक्रमक झाली. लोकहिताच्या योजना आणि विकासकामांचा जोरदार प्रचार केला गेला.
महाविकास आघाडीची भिस्त होती शरद पवारांवरच
महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची ताकद नगण्य असल्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावरच भिस्त होती. अर्थात त्यांच्याकडेही तुल्यबळ चेहरे नव्हते. अजित पवार गटातून नगरसेवकांचा गठ्ठा घेऊन आपल्याकडे आलेल्या अजित गव्हाणेंचे नाव भोसरीसाठी शरद पवारांनी ‘फायनल’ केले होते. पिंपरीतून मागच्या वेळी एबी फॉर्मच्या घोळामुळे संधी हुकलेल्या सुलक्षणा शिलवंत यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा, तर चिंचवडमधून तळ्यात-मळ्यात करणाऱ्या राहुल कलाटेंसाठी खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा आग्रह होता. अखेर या दोन नावांवर शिक्कामोर्तब झाले. मावळमध्ये शेळकेंना टक्कर देणारा उमेदवार आघाडीकडे नसल्याने अजित पवार गटातील बापूसाहेब भेगडेंच्या हाती बंडाचा झेंडा देण्यात आला. त्यामागे शेळकेंना विरोध म्हणून भाजपच्या नेत्यांचीही ताकद होती.
बलाढ्य यंत्रणेचे ‘मायक्रो प्लॅनिंग’
भाजप आणि अजित पवार गटाचे उमेदवार तसे अनुभवी. चिंचवडमध्ये साडेसहा लाखांवर, तर भोसरीत सव्वा सहा लाखांपर्यंत मतदार. त्यांना शोधून त्यांच्यापर्यंत उमेदवार आणि चिन्ह पोहोचवणे हेच खरे आव्हान. पण महेश लांडगे आणि शंकर जगताप यांच्या बलाढ्य यंत्रणेने ते आव्हान पेलले. त्यासोबत सगळे सामाजिक घटक, जाती-ज्ञातींचे समूह, छोट्या-मोठ्या संघटनांनाही वळविण्यात त्यांना यश आले. चिंचवडमध्ये सुरुवातील अजित पवार गटाने वाटेत पसरलेले ‘काटे’ अलगद बाजूला काढण्यात आले, तर भाजपमधील छुपे विरोधकही जगतापांनी आपलेसे केले. मावळ आणि पिंपरीतही मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सगळी रसद वापरण्यात आली. त्यात शेळके आणि बनसोडे माहीर. हे ‘मायक्रो प्लॅनिंग’ आपापले मतदान करवून घेण्यासाठी उपयोगास आले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे ‘टार्गेट’ ठेवून काम
महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर ठेवून उमेदवारांना बळ दिले. लांडगे आणि जगताप यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेवरील मांड पक्की करण्यात आली. शेळकेंचे मावळवर वर्चस्व असल्याने, महाविकास आघाडीतील विरोधकांचा ‘कार्यक्रम’ केला गेला. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने इच्छुकांकडून महायुतीचे काम करून घेण्यात आले.
महाविकास आघाडीचे चुकले कोठे?
महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याआधीच महायुतीने प्रचाराच्या एक-दोन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या. अजित गव्हाणे आणि सुलक्षणा शिलवंत विधानसभेच्या आखाड्यातील नवखे चेहरे होते. गव्हाणेंकडे यंत्रणा होती, मात्र लांडगेंच्या तुलनेत ती कमी पडली, तर शिलवंत यांच्याकडे विधानसभा निवडणुकीसाठीची यंत्रणाच नव्हती. शेवटच्या तीन तासांत आपले मतदार बाहेर काढण्यात दोघांना यश आले नाही. कलाटे यांना आधीच्या तीन निवडणुकांचा अनुभव होता. मात्र, ते केवळ ‘शरद पवार कार्ड’ खेळत राहिले. ‘ग्राऊंड’वर त्यांची यंत्रणा दिसत नव्हती. लांडगे, बनसोडे आणि शेळके यांना असलेला विरोध मतांमध्ये परावर्तित करण्यात सपशेल अपयश आल्याने विरोधकांना तोंडावर पडावे लागले.