अन्न फेकून न देता दान करा! गरिबांच्या पोटाला पोटभर देणारी माणसे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 01:14 AM2019-02-19T01:14:27+5:302019-02-19T01:14:44+5:30
रॉबिनहूड आर्मी : गरिबांच्या पोटाला पोटभर देणारी माणसे
योगेश गाडगे
दिघी : शिल्लक राहिलेले अन्न फेकून न देता ते आम्हाला दान करा. ते आम्ही गरिबांना वाटप करू, अशी साद घालत भुकेलेल्यांना अन्नदान असे ब्रीदवाक्य असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील रॉबिनहूड आर्मी या स्वयंसेवी संस्थेने सकारात्मक बदल घडविण्याची किमया अन्नदानाच्या कार्यातून साधली आहे. नागरिकांनीसुद्धा या उपक्रमात सहभागी होत शहरातील उपाशी पोटी असलेल्या भुकेल्यांची भूक भागवून अन्नाची होणारी नासाडी टाळत सत्यात उतरवले आहे.
अन्नाची नासाडी टाळत ते गरजूपर्यंत पोहोचवणारी रॉबीन हूड आर्मीची संकल्पना भारतात सर्वप्रथम दिल्लीत सुरू झाली. आज ७७ शहरांत ही संस्था मोठ्या ऊर्जेने कार्य करत आहे. विशेष बाब म्हणजे या संस्थेचे कुठलाही निधी किंवा फी आकारली जात नाही.
स्वयंप्रेरणेने या अन्नदानाच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून प्रत्येक जण कामात झोकून देतो. त्यामुळे हिशेब, बिले या प्रकारची कटकट नसून, फक्त शिल्लक राहिलेले अन्न भुकेल्यांना द्यावे ऐवढी सोपी आणि सहज कामाची पद्धत आहे. त्यामुळे एखाद्या समारंभात किंवा विवाह सोहळ्यात शिल्लक राहिलेल्या अन्नाची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्न निर्माण व्हायचा. मग ते कचऱ्यात, नदीपात्रात, नाल्यात टाकल्या जात होते. हे चित्र आता शहरात हळूहळू बदलल्याचे दिसत आहे.
रॉबीनहूड आर्मीमध्ये असणारे रॉबीनहूड स्वयंसेवक हे नोकरी, व्यवसाय, शाळा, महाविद्यालयातील तरुण-तरुणी, तर वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असून लहान-मोठा असा भेदभाव नाही. ही संस्था कोणताही मोबदला न घेता गरीब मुलांना आणि गरजूंना जेवण पोहोचवण्याचे काम करते.
आपल्या परिसरातील हॉटेल्सना संपर्क साधून, त्यांच्याकडे उरलेले अन्न एकत्र जमवले जाते. यानंतर हे जेवण शहरातील विविध भागांत गरीब लोकांमध्ये वाटले जाते. काही रेस्टॉरंटनी, मोठ्या सोसायट्यांनी या संस्थेमार्फत गरजूंना मदत करता यावी म्हणून खास जेवण बनवायलाही सुरुवात केली आहे. तसेच बांधकाम मजूर, विट कामगार, पालावरच्या मुलांसाठी संस्थेमार्फत विनामूल्य पाठशाळा देखील चालवली जाते.
पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ही २५ हून अधिक ठिकाणी ही संस्था कार्यरत आहे. शहरात जनजागृतीसाठी रॉबीनहूड आर्मीचा स्टॉल ठेवून ‘उरलेले अन्न फेकून न देता आम्हाला द्या, आम्ही गरजूंपर्यंत पोहोचवू, अशा प्रकारची जनजागृती करण्यात येते..
शहरातील राबिनहूड आर्मीतील सक्रिय सभासद प्राजक्ता रुद्रवार, साई तळवडेकर, अदिती चव्हाण, राहुल पाटील, पराग आहेर, चिराग शहा, पूर्वा मयूर, आकांक्षा तिवारी, हितेश रहांगडाले, श्रीनिवास मोतेवार, नकुल पेंसलवार सदैव शहरात कार्यरत आहेत.
आज समाजात एकीकडे अन्नाचा तुटवडा आहे तर एकीकडे अन्न वाया घातले जाते. म्हणून असे वाया जाणारे अन्न जमा करून गरजूंपर्यंत पोहोचवून खूप मोठे समाधान मिळते. त्यासाठी आज सर्व स्तरावरील लोक रॉबीनहूड आर्मी आमच्या संस्थेत जॉईन होऊन समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो, तत्त्वावर स्वेच्छेने हे अन्नदानाचे काम करत आहेत याचा आनंद होतोय.
-प्राजक्ता रुद्रवार,
रॉबिनहूड सामाजिक कार्यकर्त्या
रॉबिनहूड आर्मी ही एक अशीच समाजसेवी संस्था आहे. जी गरिबांसाठी काम करते. तिचे सभासद विविध हॉटेलमधील उरलेले अन्नपदार्थ जमा करतात. स्वत: चाखून पदार्थाची चव, गुणवत्ता तपासून ते अन्न शिळे नसल्याची किंवा त्यामुळे अपाय होण्याची शक्यता नाही, या सर्वांची खात्री झाल्यावर ते अन्न गरीब भुकेल्या लोकांना वाटतात. यामुळे त्यांनी एक विश्वासार्हता निर्माण करून नागरिक व अनेक कुटुंबसुद्धा शिल्लक जेवण बनवून दर दिवशी या आर्मीकडे सुपूर्त करतात.