पाणी सुरळीत करा, अन्यथा माझ्याशी गाठ!, आमदारांची प्रशासनाला तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 11:45 PM2018-10-01T23:45:07+5:302018-10-01T23:45:36+5:30
बिल्डर, ठेकेदारांना पाठिशी घातल्याचा आरोप
पिंपरी : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. नगरसेवकही तक्रारींनी त्रस्त झाले आहेत. मात्र, प्रशासन ढिम्म आहे. ‘येत्या तीन दिवसांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा माझाशी गाठ आहे, अशी तंबी प्रशासनाला देत आमदार महेश लांडगे यांनी नागरिकांना दोषी धरत अधिकाऱ्यांनी बिल्डर, ठेकेदारांना पाठिशी घालू नये’ असा इशारा दिला.
भोसरीसह शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत बैठक झाली. आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, रामदास तांबे, मकरंद निकम, नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर या वेळी उपस्थित होते. शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत उपाययोजना कराव्यात, अशा कडक सूचना लांडगे यांनी दिल्या. चुकीच्या पद्धतीने दाखले
शहरातील अनेक गृहप्रकल्पांना चुकीच्या पद्धतीने ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाते. त्यांच्याकडून नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची हमी घेतली जात नाही. सोसायट्यांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांनी पार पाडणे गरजेचे आहे. ज्या सोसायट्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या़
...तर बांधकाम परवाने रद्द करणार : श्रावण हर्डीकर
बांधकाम व्यावसायिकांनी सोसायटीतील नागरिकांना पाण्याची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. व्यावसायिकांकडून सोसायटीला पाण्याची व्यवस्था कशी केला जाणार आहे, याचा आराखडा घेण्यात यावा. त्यानंतरच बांधकाम पूर्णत्वाचे ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे़ ज्या व्यावसायिकाने पूर्वी बांधकाम केलेल्या सोसायट्यांमध्ये पाण्याची व्यवस्था केली नाही, त्यांना पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश द्यावेत. सात दिवसांची मुदत द्यावी. मुदतीत व्यवस्था न केल्यास त्यांचा बांधकाम परवाना रद्द करावा,’’ अशा सूचना आयुक्त हर्डीकर यांनी दिल्या आहेत.