दुकानांची जागा घेताहेत मॉल
By admin | Published: September 7, 2016 01:18 AM2016-09-07T01:18:47+5:302016-09-07T01:18:47+5:30
आधुनिकतेचा अंगीकार करून स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील दुकानांचा लूक बदलत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.
पिंपरी : आधुनिकतेचा अंगीकार करून स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील दुकानांचा लूक बदलत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. शहराच्या प्रमुख चौकांत आणि महापालिकेच्या समोरील मुंबई-पुणे महामार्गालगत पारंपरिक पद्धतीच्या जुन्या दुकानांचेही रुपडे पालटले आहे. मॉल संस्कृतीच्या जमान्यात काचेची चकचकीत दुकाने पहावयास मिळू लागली आहेत.
स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधांच्या पूर्ततेकडे महापालिका गांभीर्याने लक्ष देत आहे. टपऱ्या, हातगाड्या आणि पथारीवाले यांच्यासाठी हॉकर्स झोन धोरण महापालिकेने अवलंबले आहे. टपरीधारक आणि हातगाडीवाले यांचे सर्र्वेक्षण करून त्यांना विशिष्ट ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. हॉकर्स झोन, नो हॉकर्स झोन निश्चित केले जाणार आहेत. जेणेकरून शहराला बकालपणा येईल अशा पद्धतीने हातगाड्या, टपऱ्या दिसून येणार नाहीत. हा त्यामागील उद्देश आहे. शिवाय स्वच्छता राखली जाईल, हा प्रमुख उद्देश आहे. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर पुणे-मुंबई महामार्गावर, तसेच अन्य प्रकल्पांच्या ठिकाणी रस्त्यालगत दर्शनी भागात ज्या इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. त्यांना काही नियम लागू करण्यात आले आहेत. अशा ठिकाणच्या व्यावसायिक इमारतींच्या ठिकाणी प्रशस्त वाहनव्यवस्था असावी, त्याचबरोबर त्या इमारतींना कॉर्पोरेट लूक द्यावा, अशा सूचना महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून दिल्या जात आहेत. (प्रतिनिधी)