वाहतुक पोलिसाला जाब विचारणे पडले महागात : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 02:19 PM2018-10-06T14:19:06+5:302018-10-06T14:21:44+5:30
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरूद्ध कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरूद्ध कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. वाहनचालकांना थांबवुन त्यांनी यापुर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरलेला आहे का? याची तपासणी इलेक्ट्रॉनिक बील मशिनव्दारे केली जात होती. त्यावेळी ‘‘तुम्ही कोणाच्या परवानगीने रस्त्यावर वाहनांची तपासणी करत आहात’’?, ‘‘तुम्हाला कोणी अधिकार दिले ’’ अशी विचारणा करून शसकीय कामात अडथळा आणणाºया एकाला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन कांचनसिंग जुन्नी (वय ३२,राजनगर, ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार कौशल नवाब सिंग यांनी या प्रकरणी आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्याबरोबर मनिष कुमार, एस.एस. मोरे हे स्पाईन रस्ता, त्रिवेणीनगर चौक निगडी येथे वाहनचालकांना थांबवुन ‘इ वे बील’ तपासणी करीत होते. त्यावेळी आरोपी त्यांच्याजवळ आला. कोणाच्या परवानगीने वाहन तपासणी करीत आहात, तुम्हाला कोणी अधिकार दिले? अशी विचारणा करू लागला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्या आदेशानुसार शहरात ठिकठिकाणी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईची मोहिम सुरू आहे. गेल्या २० दिवसांत सुमारे २५ हजार वाहनचालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. साडेसहाशे वाहनचालकांवर उलट दिशेने वाहन चालवुन रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई केली आहे. त्यामध्ये सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, ट्रिपलसिट अशा प्रकारे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांचा समावेश आहे. हिंजवडी, वाकड येथील वाहतुक कोंडी समस्येवर विविध उपाययोजनांव्दारे तोडगा काढला जात असताना,शहराच्या विविध भागात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.