Fraud: महिलेला डेटिंग ॲपवरील ओळख महागात पडली; लग्नाच्या आमिषाने ७३ लाखांची फसवणूक केली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 03:25 PM2021-10-14T15:25:36+5:302021-10-14T15:26:23+5:30
महिलेला टिंडर डेटिंग ॲपवर ओळख वाढवून विश्वास संपादन करत लग्न करण्याचे व भारतात येऊन स्थायिक होण्याचे आमिष दाखविले.
पिंपरी : आयटी अभियंता असलेल्या महिलेला टिंडर डेटिंग ॲपवरील ओळख महागात पडली. लग्नाचे आमिष दाखवून महिलेची ७३ लाख ५९ हजार ५३० रुपयांची फसवणूक केली. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जून २०२१ ते १३ जुलै २०२१ या कालावधीत फसवणुकीची ही घटना घडली. याप्रकरणी पीडित ३५ वर्षीय महिलेने बुधवारी (दि. १३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ही उच्चशिक्षित आहे. आयटी अभियंता म्हणून आयटी कंपनीत नोकरीला आहे. दरम्यान लग्नासाठी महिलेने विविध ॲप्सवर सर्चिंग सुरू केले. त्यात टिंडर डेटिंग ॲपवरून एस. रवी नावाच्या प्रोफाइल धारकाशी ओळख झाली. त्यानंतर रवीने त्याचा व्हाटसअप क्रमांक दिला. त्यावर त्याने सिद्धार्थ रावी नाव सांगितले. तसेच आणखी एक व्हाटसअप क्रमांक देऊन जेनी रवी नाव सांगितले. त्यानंतर महिलेशी ओळख वाढवून विश्वास संपादन केला. तसेच लग्न करण्याचे व भारतात येऊन स्थायिक होण्याचे आमिष दाखविले.
दरम्यान, रावी याने महिलेला महागडे गिफ्ट पाठवून विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेला भेटण्यासाठी भारतात आल्याचे सांगितले. त्याच्याकडे एक कोटी रुपयांची मोठी रक्कम असल्याने त्याला दिल्ली विमानतळावर कस्टम ऑफिसरने पकडले असल्याचे त्याने महिलेला सांगितले. ती मोठी रक्कम सोडविण्यासाठी वेगवेगळे चार्जेस, दंड, जीएसटी तसेच इतर अनेक कर भरायचे आहेत, अशी विविध कारणे सांगितली. त्यानंतर वेगवेगळ्या बँकांचे खाते नंबर देऊन त्यावर महिलेला ७३ लाख ५९ हजार ५३० रुपये भरण्यास भाग पाडले. महिलेची आर्थिक फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी महिलेने पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलकडे अर्ज करून तक्रार केली. त्यानुसार चौकशी करून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप तपास करीत आहेत.