खुनाचा कट रचल्याप्रकरणी मंचरकर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 02:51 AM2017-09-16T02:51:16+5:302017-09-16T02:51:50+5:30
माजी नगरसेवक व कामगार नेते कैलास कदम यांच्या खुनाचा कट रचून सुपारी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती अॅड. सुशील हरिश्चंद्र मंचरकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
पिंपरी : माजी नगरसेवक व कामगार नेते कैलास कदम यांच्या खुनाचा कट रचून सुपारी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती अॅड. सुशील हरिश्चंद्र मंचरकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
युनिट चारचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तोडकर यांनी दिलेली माहिती अशी - मंचरकर याच्यासह सुरेश स्वामीनाथ झेंडे (वय २९, रा. दत्तराज कॉलनी, पवनानगर), राजू ऊर्फ काल्या महादेव पात्रे (वय ३२, रा. विद्यानगर, चिंचवड) यांना अटक केली असून, अन्य तीन जण फरार आहेत.
वेगवेगळ्या गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना पुणे मुख्यालयाच्या पोलिसांनी सातारा, खंडाळा येथील न्यायालयात नेले होते. परतत असताना हे गुन्हेगार पोलिसांना चकवा देऊन फरार झाल्याचे दर्शविण्यात आले. दरम्यान, हे गुन्हेगार मोरवाडी येथील न्यायालयासमोरून पळून गेल्याचे स्पष्ट झाल्याने पिंपरीकडे गुन्हा तपासासाठी वर्ग केला. दरम्यान, गुन्हे शाखा तपास करीत असताना फरारी गुन्हेगार सापडले. त्यांच्याकडून ही माहिती समोर आली आहे.
पिंपरी येथील माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी देण्यात आल्याची माहिती या गुन्हेगारांनी दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंचरकर याला शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता, १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.