भूमकर चौक येथे ऑईल गळती ; तरुणांच्या तत्परतेने टळले अनेकांचे अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 06:51 PM2019-05-10T18:51:59+5:302019-05-10T18:53:17+5:30
ऑईल सांडल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून याठिकाणी अपघात झाले...
थेरगाव : डांगेचोक कडून हिंजवडी कडे जाणाऱ्या मार्गावर भूमकर चौक येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑईल गळती झाली होती. त्यामुळे पूर्ण ऑईल रस्त्याच्या मध्ये पसरल्यामुळे जवळपास ३०-३५ वाहने घसरून अपघात झाले. मात्र, त्यानंतर थेरगाव मधील काही तरुणांच्या तत्परतेमुळे अनेक अपघात टळले.
ऑईल सांडल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून याठिकाणी अपघात झाले. अनेकांना शारीरिक दुखापत झाली. यावेळी तेथून जाणारे सजग नागरिक अभिजीत जाधव यांनी ही घटना पहिली व थेरगाव सोशल फाउंडेशनच्या सदस्यांना दूरध्वनीद्वारे कळविली. सदस्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला. त्यामुळे कसलाही विलंब न करता अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन ऑईल सांडलेल्या ठिकाणी पाणी मारून रास्ता साफ केला.
घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी येईल पर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी थेरगाव सोशल फाउंडेशनचे अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, राहुल जाधव, अंकुश कुदळे, श्रीकांत धावारे, अभिजीत जाधव यांनी वाहतूक वळवली व त्या ठिकाणी कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घेतली . या ठिकाणी कार्यरत असलेले वाहतूक पोलीस यांनी मौलाचे सहकार्य केले.
भूमकर चौक हा शहरातील महत्वाचा मार्ग आहे. एक रस्ता शहरीकरणाकडे तर दुसरा रस्ता औद्योगिकरणाकडे जात असल्याने या ठिकाणी दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ चालू असते. अग्निशामक दलाने वेळेत येऊन सांडलेले आॅइल साफ केल्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.