अपंग विकास महासंघामुळे अनेकांना लाभ
By admin | Published: March 28, 2017 02:37 AM2017-03-28T02:37:06+5:302017-03-28T02:37:06+5:30
अपंग विकास प्रसार केंद्र महासंघाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक अपंगांना लाभ मिळाल्याचे
कामशेत : अपंग विकास प्रसार केंद्र महासंघाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक अपंगांना लाभ मिळाल्याचे येथील स्नेहमेळाव्यात सांगण्यात आले.
महासंघाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त मावळ तालुक्यातील सर्व अपंग बांधवांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात रविवारी करण्यात आले. या मेळाव्याला सुमारे ३०० लोकांनी हजेरी लावली. मेळाव्याचे उद्घाटन महासंघाचे अध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते झाले. शासनाच्या अपंग बांधवांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. अपंग बांधवांची शासन व समाजाकडून होणारी कुचंबणा व ससेहोलपट व त्यावर करावयाची मात या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
तळागाळातील अपंगांच्या योजना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे लाभार्थींपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे अपंग बांधव या योजनांपासून वंचित राहतात. अनेक ठिकाणी अपंगांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी समाजातील सर्व अपंग बांधवांनी एकत्र येणे गरजेचे असल्याने २२ फेबु्रवारी २०११ रोजी तालुक्यातील अपंग बांधवांना एकत्र करून अपंग विकास प्रसार केंद्र महासंघाची स्थापना करण्यात आली. महासंघामुळे अनेक अपंग बांधव एकत्र आले असून, त्यामुळेच तालुक्यातील १८२ अपंग, विधवा, निराधारांना पेन्शनचा लाभ मिळाला. पंचायत समितीच्या माध्यमातून १२ टपरी प्रकरणे, समाजकल्याण विभागातून सात जणांना बीजभांडवल, खादीग्रामोद्योगामधून १५ जणांना लाभ, वित्त विकास महामंडळाकडून पाच जणांना लाभ, जिल्हा आरोग्य रुग्णालयातून २३५ जणांना अपंग प्रमाणपत्र महासंघाने मिळवून दिली.
४० टक्के निधी कामशेतमधील ४६ लोकांना मिळवून दिला. वडगाव, कान्हे, परंदवडी, वेहेरगाव, कुसगाव, सदापूर, काम्ब्रे, करंजगाव, थोरण, जांभवली, नाणवली, गोवित्री, बौर, चिखलसे, साते, टाकवे, अहिरवडे, तळेगाव व लोणावळा नगर परिषद आदी भागांमधील पाठपुरावा सुरू असल्याची महिती महासंघाचे अध्यक्ष व सचिव यांनी दिली.
महासंघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. उपाध्यक्ष विष्णू कांबळे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष गोकुळ लक्ष्मण सुरवसे, जिल्हाध्यक्ष सचिन जोशी, जिल्हा उपाध्यक्ष अकबर मैनुद्दीन शेख, आंबेगाव तालुकाध्यक्ष आशा रणपिसे, सहसचिव महाराष्ट्र कासम रसूल शेख, सचिव नितीन पवार यांना अध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रस्तावना संजय राठोड यांनी केली. जोशी यांनी सूत्रसंचालन व कासम शेख यांनी स्वागत केले. (वार्ताहर)