खड्डा घालतोय अनेकांना ‘खड्ड्यात’

By admin | Published: November 26, 2015 12:53 AM2015-11-26T00:53:40+5:302015-11-26T00:53:40+5:30

ग्रेड सेपरेटरमधील खड्डे आणि ‘मर्ज इन, मर्ज आऊट’ यामध्ये वारंवार होणारे बदल यामुळे ग्रेड सेपरेटरमध्ये अपघातांची जणू मालिकाच सुरू झाली आहे

Many people in the 'pit' | खड्डा घालतोय अनेकांना ‘खड्ड्यात’

खड्डा घालतोय अनेकांना ‘खड्ड्यात’

Next

मंगेश पांडे,  पिंपरी
पिंपरी : ग्रेड सेपरेटरमधील खड्डे आणि ‘मर्ज इन, मर्ज आऊट’ यामध्ये वारंवार होणारे बदल यामुळे ग्रेड सेपरेटरमध्ये अपघातांची जणू मालिकाच सुरू झाली आहे. पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमधील खड्ड्यांमुळे लागोपाठ दोन दिवसांत दोन अपघात झाले. विशेष म्हणजे दोन्ही अपघात त्याच खड्ड्यामुळे झाल्याचे समोर आले आहे. पण तो खड्डा बुजविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तत्परता दाखविली नाही. आणखी किती जण ‘खड्ड्या’त गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहे.
जलद वाहतुकीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी ते दापोडी दरम्यान साडेबारा किलोमीटर लांबीचा आणि २२ मीटर रुंदीचा ग्रेड सेपरेटर २००८मध्ये बांधण्यात आला. यामुळे निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून शहरात प्रवेश केल्यानंतर थेट पुण्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे. अवघ्या बारा ते पंधरा मिनिटांतच निगडीहून दापोडीला पोहोचता येते. यामध्ये वाहनांचा वेगही अधिक असतो. मात्र, विविध ठिकाणी पडणारे खड्डे, ठिकठिकाणी सांडणारे आॅईल, यामुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटते. दरम्यान, अचानक ब्रेक दाबल्यास वेगातील मागील वाहने एकमेकांवर धडकण्याचे अनेक प्रकार घडले आहेत.
गेल्या दोन दिवसांत लागोपाठ दोन अपघात झाले. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही दिवसांपासून ग्रेड सेपरेटरमध्ये अपघातांची मालिकाच सुरू आहे. त्यामुळे या मार्गाने जाताना वाहनचालक चिंतेत पडतात.
पुण्याहून निगडीकडे जाणाऱ्या मार्गावर पिंपरीतील बँक आॅफ इंडियासमोरील ग्रेड सेपरेटरमध्ये दोन खड्डे पडले आहेत. हे दोन्ही खड्डे वाहनांच्या दोन चाकामधींल अंतराइतकेच अंतरावर पडले आहेत. त्यामुळे ते चुकविणे वाहनचालकाला शक्य होत नाही. पर्यायाने चालक अचानक ब्रेक दाबतो. अशाच प्रकारे सोमवारी आणि मंगळवारी दोन अपघात या ठिकाणी घडले.
यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशाच प्रकारचे खड्डे ग्रेड सेपरेटरमध्ये अनेक ठिकाणी आहेत. हे खड्डे अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहेत.
ग्रेड सेपरेटरमध्ये ठिकठिकाणी आत जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी ‘मर्ज इन, मर्ज आऊट’ ठेवण्यात आले आहेत. मात्र, विविध कारणांनी दर चार-पाच दिवसांनी ‘मर्ज इन’च्या ठिकाणी ‘मर्ज आऊट’, तर ‘मर्ज आऊट’च्या ठिकाणी ‘मर्ज इन’ असे बदल केले जातात. दरम्यान, भरधाव जात असताना रोजच्या सवयीनुसार वाहनचालक ‘मर्ज आऊट’च्या ठिकाणाहून बाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच, त्या ठिकाणी ‘मर्ज इन’चा बदल केलेला असतो. अशा वेळी वाहनचालक गडबडतो अन् अचानक ब्रेक दाबल्यास अपघात होतो. या प्रकारे वारंवार होणाऱ्या बदलांमुळेही अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.
पिंपरीतील ग्रेड सेपरेटरमध्ये सोमवारी आणि मंगळवारी लागोपाठ दोन अपघात झाले. विशेष म्हणजे दोन्ही एकाच ठिकाणी झाले. यासह सात महिन्यांपूर्वी काळभोरनगर येथे ग्रेड सेपरेटरमध्ये झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. चिंचवड स्टेशन येथे तीन महिन्यांपूर्वी पीएमपी कंपनीची वाहनदुरुस्तीची मोटार उलटली होती. तीन वर्षांपूर्वी मोरवाडी चौकाखालील गे्रड सेपरेटरमध्ये मालवाहू ट्रक खड्ड्यात उलटल्याने एकाचा मृत्यू झाला होता. यासह कासारवाडी ते दापोडी दरम्यानच्या मार्गावरही वारंवार वाहने घसरून अपघात घडत आहेत. पूर्ण मार्गावर दररोज एक तरी किरकोळ अपघात घडतो.
दुचाकी उभी करून मोबाईलवर गप्पा मारणे, एसटी वा खासगी प्रवासी बस गे्रड सेपरेटरमध्येच उभी करून प्रवाशांना उतरविणे, बंद पडलेले वाहन वेळेत न हटविणे आदी कारणांमुळेही अपघात होत आहेत. वारंवार होणारे अपघात, ठिकठिकाणी बसविण्यात आलेले गतिरोधक यामुळे अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सेवा रस्त्याने जितका वेळ लागतो, तितकाच वेळ गे्रड सेपरेटरमधून लागतो. जलद वाहतुकीच्या हेतूला खीळ बसत आहे. जास्त उंचीचे कंटेनर अडकण्याच्या घटना तर नित्याच्याच आहेत. सर्वाधिक घटना पिंपरी चौकातील गे्रड सेपरेटरमध्ये घडत आहेत. ‘मर्ज इन’ असलेल्या ठिकाणी अधिक उंचीच्या वाहनांना सेपरेटरमधून जाण्यास बंदी असल्याचे फलक लावलेले असतानाही सेपरेटरमध्ये वाहने घुसविली जातात.

Web Title: Many people in the 'pit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.