मराठा क्रांती मोर्चा: शोकसभा, रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 02:42 AM2018-07-26T02:42:06+5:302018-07-26T02:42:26+5:30

पिंपरी-चिंचवडमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी शोकसभा घेण्यात आली.

Maratha Kranti Morcha: Shokasabha, Patha Roko Movement | मराठा क्रांती मोर्चा: शोकसभा, रास्ता रोको आंदोलन

मराठा क्रांती मोर्चा: शोकसभा, रास्ता रोको आंदोलन

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी शोकसभा घेण्यात आली. तसेच काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. तसेच मावळ तालुक्यामध्ये दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली.
मराठा समाजाच्या मागण्यांची वेळीच दखल घेतली गेली नाही. केवळ आश्वासने दिली गेली. समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या आंदोलनात तरुणांना बलिदान द्यावे लागले. या परिस्थितीस सरकार जबाबदार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड सकल मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्याकडे केली आहे.
औरंगाबाद येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने बलिदान दिले. हवालदार श्याम काटगावकर यांचा जीव गेला. या घटनांना सरकार जबाबदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा. ज्यांचा जीव गेला त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने भरपाई द्यावी. या मागण्यांची दखल न घेतल्यास १० कार्यकर्त्यांंसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून सामूहिक आत्महत्या करणार असल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. प्रकाश जाधव, नकुल भोईर, सतीश काळे, वैभव जाधव, अमोल मानकर, धनाजी येळकर, हर्षवर्धन भोईर आदींच्या शिष्टमंडळाने गणेश शिंदे यांची भेट घेतली.

सकल मराठा मोर्चाकडून डांगेचौकात शोकसभा
थेरगाव : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे यांना थेरगावच्या डांगे चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सकल मराठा क्रांती मोर्चाकडून शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाकड पोलिसांनी या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. मराठा समाजबांधव या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देहूगाव परिसरामध्ये बंद
देहूगाव : श्रीक्षेत्र देहूगाव येथे मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी येथील सर्वपक्षीय पदाधिकारी, सकल मराठा समाज व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. फेरीनंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. हे निवेदन गावकामगार तलाठी अतुल गिते यांनी स्वीकारले. निवेदनात सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा भाग आणि शासनाचे या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी श्रीक्षेत्र देहूगाव येथील सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ,व्यापारी आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने गावातून फेरी काढण्यात आली. माजी सरपंच मधुकर कंद यांनी आंदोलनात मृत पावलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली. सुनील हगवणे, अजित काळोखे, स्वप्निल मधुकर काळोखे यांनी मनोगत व्यक्त केले. या फेरीमध्ये रमेश हगवणे, अभिमन्यू काळोखे, देविदास हगवणे, शांताराम हगवणे, संजय मोरे, बाळासाहेब काळोखे, माणिक जाधव, विठ्ठल काळोखे, तुकाराम काळोखे, शंकर काळोखे, उमेश मोरे, दत्तात्रय बांगर, संतोष शिंदे, सोमनाथ चव्हाण, संजय जंबुकर, पांडुरंग शेडगे, रामदास काळोखे, अभिजित कंद, स्वप्निल काळोखे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

माळेवाडीमध्ये अडविला रस्ता
तळेगाव स्टेशन : माळवाडीमध्ये सकल मराठा समाजातर्फे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे व अन्य मागण्यांसाठी माळवाडीतील सकल मराठा समाजातर्फे तळेगाव-चाकण महामार्ग अडविण्यात आला होता. यामध्ये ठिय्या आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला व त्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
माळवाडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी मावळच्या नायब तहसीलदार व एमआयडीसी पोलीस निरीक्षकांना आंदोलनासंदर्भात निवेदन देण्यात आले. माळवाडी येथे बुधवारी संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. शांततेच्या मार्गाने घोषणा देत गावाला फेरी मारून महामार्ग अडविण्यात आला. या वेळी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे वाचन करण्यात आले.

Web Title: Maratha Kranti Morcha: Shokasabha, Patha Roko Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.