मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र, पुरावे शोधण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 06:14 PM2023-11-07T18:14:00+5:302023-11-07T18:14:42+5:30
याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे...
पिंपरी : मराठा समाजास मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत आवश्यक पुरावे शोधण्याच्या अनुषंगाने महापालिकेशी संबंधित अभिलेखांमध्ये उपलब्ध असलेल्या पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करून दस्तावेजांची पुर्तता करून घेण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.
याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे. संपुर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मराठा समाजातील संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी कशी करावी, तपासणी अंती कुणबी जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करून अहवाल शासनास सादर करण्याकामी निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १९४८ ते १९६७ या कालावधीतील जन्म-मृत्यु नोंदी, शैक्षणिक अभिलेख, भूमी अभिलेख, सेवानोंद पुस्तके तसेच महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या कर आकारणी नोंद रजिस्टरमध्ये कुणबी जातीच्या पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून त्याबाबतचा अहवाल शासनाच्या मार्गदर्शक निर्देशांनुसार सादर करण्यासाठी निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कामकाजाच्या अनुषंगाने महापालिकेच्या संबंधित विभागांना काही आदेशदेखील देण्यात आले आहेत.