Maratha Reservation : चाकणमधील हिंसाचारामागे बाहेरचे हात, पोलिसांना संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 08:36 AM2018-07-31T08:36:24+5:302018-07-31T11:59:14+5:30
Maratha Reservation : चाकणमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर येथील पीएमपीएमएल बस सेवा आज बंद ठेवण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड - सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला सोमवारी (30 जुलै) चाकण येथे हिंसक वळण लागले. जमावाने एसटी, पुणे शहर वाहतूक सेवेच्या बस, कार, जीप व अग्निशमन बंबासह 16 वाहनं पेटवली. शंभरावर वाहनांची तोडफोड केली. दोन पोलीस व्हॅनही जाळल्या. चाकणमध्ये झालेल्या या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर येथील पीएमपीएमएल बस सेवा आज बंद ठेवण्यात आली आहे. पुणे-नाशिक मार्गावरील एसटी सेवादेखील बंद ठेवण्यात आली आहे. सोमवारी चाकणमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर एसटी प्रशासनानं आज सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
( सामाजिक न्यायाची पुंगी गाजराची पुंगी ठरू नये, उद्धव ठाकरेंचा सरकारला सल्ला )
दरम्यान, हा हिंसाचार मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांनी नाही तर बाहेरुन आलेल्या जमावानं घडवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हिंसाचाराप्रकरणी चार ते पाच हजार लोकांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही, व्हायरल व्हिडीओद्वारे पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे.
Pune: Two cases have been registered against 4000-5000 agitators for violence that broke out during protests over #MarathaReservation in Chakan area yesterday. #Maharashtra
— ANI (@ANI) July 31, 2018
सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम
शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे आजपर्यंत पाच तरुणांनी आत्महत्या केल्या. राज्यभर ठिय्या आंदोलने सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी सोमवारी औरंगाबादला केली. पाटील म्हणाले की, काहीजण राजकीय लाभासाठी आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. आजपर्यंत पाच समाजबांधव आमच्यातून गेलेत. मराठा क्रांती मोर्चा सरकारला सात मुद्द्यांचा ‘फॉर्म्युला’ देत आहे. राज्यमागास आयोगाला अहवाल देण्यासाठी तातडीने विनंतीपत्र किंवा आदेश द्यावेत. पत्राची तारीख जाहीर करावी. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अध्यादेश काढण्याची तारीख जाहीर करावी, आयोगाचा अहवाल पूर्ण स्वीकारणार किंवा शिफारशी अंशत: स्वीकारणार, हे लगेच स्पष्ट करावे.