महापालिकेकडून मराठी भाषेची गळचेपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 02:36 AM2019-02-28T02:36:16+5:302019-02-28T02:36:18+5:30
सत्ताधाऱ्यांमध्ये उदासीनता : भाषा संवर्धन समितीची अंमलबजावणी कागदावरच
विश्वास मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : शासकीय कामांत मराठीचा वापर करा आणि मराठी भाषा संवर्धन समिती नेमा, असे निर्देश असताना मराठीचा वापर आणि समिती अद्याप कागदावरच आहे. समिती सदस्यांची नियुक्ती झाली असली, तरी प्रत्यक्षपणे कामकाजास सुरुवात झालेली नाही. भाषा आणि संस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मराठी भाषेबद्दल उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासन मराठीचा गळा घोटत आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
राज्य सरकारने शासकीय कामात मराठीचा वापर करा. तसेच मराठी भाषा संवर्धन समिती नेमा असे निर्देश राज्य सरकारने दिले होते. मात्र, महापालिका कामकाजात पूर्णत: मराठीचा वापर, समितीही कागदावरच राहिली आहे.
समिती स्थापन काम नाहीच वर्षभराने भाषा संवर्धन समिती स्थापन केली. कला, क्रीडा समितीने मंजुरीही दिली. समितीत सभापती संजय नेवाळे (सदस्य), शिक्षणाधिकारी ज्योत्सना शिंदे (पदसिद्ध सचिव), डॉ. शहाबुद्धीन पठाण, मसापचे राजन लाखे, धनंजय भिसे, डॉ. राजाभाऊ भैलुमे, प्रा. संजय पवार, प्रा. गुलाबराव देशमुख, अपर्णा मोहिले, डॉ. राजेंद्र कांकरिया, डॉ. राजश्री मराठे, साहित्यिक विनिता ऐणापुरे, डॉ. रजनी शेठ, राज अहिरराव, संभाजी बारणे, डॉ. स्रेहल अग्निहोत्री, प्रा. तुकाराम पाटील, झुंजार सावंत, सुरेखा कुलकर्णी, अविनाश वाळुंज, संतोष उपाध्ये, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, नगरसेविका सुजाता पालांडे, अपर्णा डोके (सदस्य) यांचा समावेश आहे. मात्र, या समितीचे प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.
नावे बदलेना
महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकारी यांची नावे एच. सी़ देशमुख न लिहता, शिवराम सुधाकर देशमुख असे लिहावे, असे निर्देश दिले होते. असे असताना त्या वेळी महापालिकेच्या चौथ्या मजल्यावर संगणक विभाग, तसेत तळमजल्यावरील निवडणूक विभागात इंग्रजीतील फलक असल्याचे उघडकीस आणले होते. त्यानंतर मनसेने इंग्रजी फलकांना काळे फासले होते. दहा महिन्यांपूर्वी मिळालेल्या आदेशाची शंभर टक्के अंमलबजावणी झालेली नाही. महापालिकेतील पहिल्या, दुसºया, तिसºया आणि चौथ्या मजल्यावरील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या पाट्या इंग्रजीतच आहेत, असे आजही दिसून येते. याबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
समितीतही राजकारण
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी भाषा संवर्धन समिती स्थापन करावी, असे आदेश राज्य शासनाने दिले. अखेर सापडला समितीचा मुहूर्त महापालिकेत समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. शहर परिसरातील साहित्य कला आदी विविध क्षेत्रांतील नागरिकांनी यासाठी प्रयत्न केले होते. तसेच आपल्याच नावाची वर्णी लागावी म्हणून सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांचे उंबरेही काहींनी झिजविले होते. समितीत किती सदस्य असावेत, याबाबत महापालिका प्रशासनही संदिग्ध होते. राजकीय पक्षाचा आधार घेऊन काहीनीं वजन वापरले होते. त्यामुळे निवड प्रक्रिया लांबणीवर पडली होती. समिती नियुक्त होत नसल्याने काही साहित्यप्रेमींनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यावर साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनाच संधी द्यावी, अशी मागणी केली होती.
मराठी भाषा दिन सुनासुना
मराठी राजभाषा दिनानिमित्त महापालिकेतील नवनियुक्त समितीतर्फे कार्यक्रम होणे अपेक्षित होते. मात्र एकही कार्यक्रम झाला नाही. महापालिका शाळांमध्ये कार्यक्रम झाला, असे शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्सना श्ािंदे म्हणाल्या, ‘‘महापालिका शाळांमध्ये मराठी भाषा दिन साजरा झाला. मात्र, भाषा समितीचे कामकाज प्रत्यक्षपणे अजून सुरू झालेले नाही. त्यामुळे समितीतर्फे दिवस साजरा झाला नाही. लवकरच समितीची बैठक घेऊन कार्यप्रणाली ठरविण्यात येईल.’’