मूल होत नसल्याने नवरीच्या वेशात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 05:45 PM2018-07-09T17:45:05+5:302018-07-09T18:52:06+5:30
तिने लग्नातला शालू, सोन्याचे दागिने परिधान केले. हाताला मेहंदी लावली. माथ्यावर बिंदी लावली. त्यानंतर नवविवाहितेने आत्महत्या केली.
पिंपरी : मूल होत नसल्याच्या कारणावरून पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून प्रेमविवाह झालेल्या नवविवाहितेने लग्नाचा पेहराव परिधान करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. ७जुलै) भोसरी येथे घडली. विद्या शैलेश पारधी (वय २४, रा. भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्याचा काही वर्षांपूर्वी शैलेशबरोबर प्रेमविवाह झाला होता. त्यांचा सुखी संसार सुरू होता. मात्र, हे सुख काही काळच टिकले. विद्याला बाळ होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पती शैलेश दारु पिऊन तिला मारहाण करू लागला. पतीचा राग कमी व्हावा, यासाठी विद्या काही दिवस मैत्रिणीकडे राहण्यास गेली. तिने आई-वडिलांच्या संमतीशिवाय प्रेमविवाह केला असल्याने आई-वडील दुरावले होते.
प्रेमविवाहामुळे आई-वडील नाराज आणि मूल होत नाही म्हणून पतीचा जाच अशा पेचात विद्या सापडली होती. शनिवारी ती शैलेशकडे गेली. तेथे जाऊन तिने लग्नातला शालू, सोन्याचे दागिने परिधान केले. हाताला मेहंदी लावली. माथ्यावर बिंदी लावली. त्यानंतर तिने आत्महत्या केली.
आत्महत्येपूर्वी विद्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये तिने पती शैलेशला दुसरा विवाह कर असे लिहून ठेवले आहे. दुसऱ्या पत्नीला त्रास देऊ नको, अशी विनंतीही केली आहे.