देहूरोडला प्रथमच आठवडे बाजार
By admin | Published: April 29, 2017 04:12 AM2017-04-29T04:12:23+5:302017-04-29T04:12:23+5:30
कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये जय हनुमान शेतकरी कृषी गट व कॅन्टोन्मेन्ट बोर्ड सदस्य गोपाळराव तंतरपाळे
देहूरोड : कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये जय हनुमान शेतकरी कृषी गट व कॅन्टोन्मेन्ट बोर्ड सदस्य गोपाळराव तंतरपाळे मित्र परिवार यांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने गुरुवारपासून शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे.
शासनाने सुरू केलेल्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत बळिराजाच्या शेतातील शेतमाल थेट ग्राहकांच्या दारात देण्याच्या उद्देशाने कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या हद्दीत बँक आॅफ इंडियाच्या शाखेजवळ आठवडे बाजाराचे गुरुवारी कॅन्टोन्मेन्ट सदस्य तंतरपाळे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, रामकिसन गर्जे, सुनील उपाध्याय, पंकज तंतरपाळे यांच्यासह संकल्पनगरी परिसरातील नागरिक उपस्थित होते. येथील आठवडे बाजार दर गुरुवारी व रविवारी भरविण्यात येणार आहे. बाजारात भाजीपाला, फळे, सेंद्रिय व गावरान भाजीपाला, धान्य व कडधान्ये, राजसी भाजीपाला उपलब्ध करण्यात आला आहे. बाजाराच्या पहिल्या दिवशी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभल्याचे सांगण्यात आले.
शेतकरी आठवडा बाजारांमध्ये उकृष्ट दर्जाच्या मालाची विक्री बंधनकारक करण्यात आली असल्याने दर्जेदार मालच या बाजारामध्ये आणला जाणार आहे. (वार्ताहर)