शहरात बाजारपेठा आॅफलाइन, आॅनलाइन खरेदीचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 01:18 AM2018-11-12T01:18:37+5:302018-11-12T01:19:09+5:30
आॅनलाइन खरेदीचा परिणाम : व्यापाऱ्यांवर दिवाळीमध्ये कोसळली संक्रांत
रहाटणी : सणासुदीच्या काळात बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसून येत असे. घरबसल्या हव्या त्या वस्तूसाठी आॅनलाइनचा पर्याय उपलब्ध झाल्याने सध्या ऐन दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये मात्र शुकशुकाट जाणवू लागला आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, तसेच आणखी काही खरेदी करायचे असेल, तर गर्दीतून मार्ग काढत, रांग लावून बाजारपेठेतील दुकानांमध्ये जाण्याऐवजी मोबाइलच्या माध्यमातून ‘आॅनलाइन शॉपिंग’ला प्राधान्य दिले जात आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाºया व्यापाºयांना त्याची झळ बसू लागली आहे.
सणासुदीच्या काळात बाजारपेठेमध्ये ग्राहकांची गर्दी व्हायची. त्यामुळे दिवाळीच्या काळात कामगारांनाही सुगीचे दिवस होते. चार दिवसांसाठी महिनाभराचा पगार देऊन कामगारांना कामासाठी ठेवले जायचे. परंतु, यंदा ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरविल्याने अनेक जणांच्या हाताला काम मिळाले नाही. परराज्यातून आणि परजिलह्यातून येणाºया कामगारांना काम मिळाले नाही. परिणामी ऐनदिवाळीत त्यांना बेरोजगार रहावे लागले. तसेच मजूर अड्ड्यावरील मजुरांनाही काम मिळाले नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी गोड झाली नाही. कामगारांमधून नाराजीचा सूर निघाला. तसेच अनेक व्यापाºयांनाही माल न खपल्यामुळे तोटा सहन करावा लागला. आॅनलाइन व्यवहाराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला.
पूर्वी सण, उत्सवाच्या काळात दुकानांमध्ये गर्दी असायची. मात्र सध्या आॅनलाइन शॉपिंगच्या जमान्यात दुकानात येऊन खरेदी करणाºया ग्राहकांची संख्या घटली आहे. सण, उत्सव काळातही दुकानात तुरळकच गर्दी असते. सर्वसामान्य नागरिक, सध्या खरेदीसाठी येत असल्याचे दिसते. ज्या नागरिकांच्या हातात स्मार्ट फोन आहेत, त्यांना आॅनलाइन खरेदीचे महत्त्व पटले आहे. तरुण, सुशिक्षित वर्गाने सध्या पारंपरिक बाजारपेठेकडे पाठ फिरवली आहे. आॅनलाइन खरेदीवर शासनाने नियंत्रण आणावे. ग्राहकच या आॅनलाइन खरेदीला पसंती देत असल्याने नक्की दोष कोणाला द्यायचा, शासन की ग्राहकाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. - गणेश राठी, कापड व्यापारी
होळी, गुढी पाडवा, मकर संक्रांत, दसरा, दिवाळी या सणांना हिंदू संस्कृतीमध्ये फार महत्त्व आहे. कपडे, चैनीच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू अशा अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक बाजारपेठेमध्ये जात असत. मात्र काही वर्षांपासून आॅनलाइन शॉपिंगकडे बहुतांश ग्राहक वळला आहे. आॅनलाइन शॉपिंगमध्ये मोठ्या रकमेच्या वस्तूंसाठी सुलभ हप्त्याने रक्कम अदा करण्याची सोय असते. त्यामुळे आॅनलाइन शॉपिंगला महत्त्व आले आहे.
- मोनिस परिहार, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेते
४आॅनलाइन कंपन्या अगदी १० टक्क्यांपासून ते ६० टक्क्यापर्यंत डिस्काउंट देत असल्याने ग्राहकांचा कल आॅनलाइन खरेदीकडे अधिक आहे. आॅनलाइन शॉपिंगमुळे पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाºयांपुढे संकट निर्माण झाले आहे. आताच अशी परिस्थिती तर पुढील काळात कसे होणार, अशा विवंचनेत दुकानदार, व्यापारी वर्ग आहे.
४नेहमीच्या बाजारपेठेत मिळणाºया वस्तूंच्या तुलनेत चांगल्या व स्वस्त दरात आॅनलाइन वस्तू मिळत असल्याने ग्राहक वर्ग या आॅनलाइन शॉपिंगकडे आकर्षित झाला आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात नेहमीच्या बाजारपेठेत होणारी आर्थिक उलाढाल काही प्रमाणात कमी झाली आहे. ग्राहकांना सवलत देऊन आपल्याकडे वळविण्याचा फंडा आॅनलाइन मार्केटमध्ये सुरू असल्याने याचा फटका स्थानिक व्यापाºयांना बसू लागला आहे.