घरांवर लाल रेषांचे मार्किंग, प्राधिकरणाकडून अंतिम नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 02:38 AM2018-01-02T02:38:37+5:302018-01-02T02:38:45+5:30
रावेत-वाल्हेकरवाडी या ३४.५ मीटर अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जागेचा ताबा घेण्याकरिता अडथळा ठरत असलेल्या घरांना प्राधिकरणाच्या वतीने अंतिम नोटीस बजावीत घरांवरती अंतिम लाल रेषांचे मार्किंग करण्यात आले. दोन ते तीन वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात भूसंपादनाअभावी रावेत ते चिंचवड
रावेत : रावेत-वाल्हेकरवाडी या ३४.५ मीटर अर्धवट अवस्थेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जागेचा ताबा घेण्याकरिता अडथळा ठरत असलेल्या घरांना प्राधिकरणाच्या वतीने अंतिम नोटीस बजावीत घरांवरती अंतिम लाल रेषांचे मार्किंग करण्यात आले.
दोन ते तीन वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात भूसंपादनाअभावी रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतचे काम अर्धवट अवस्थेत आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणाने कंबर कसली असून, त्याकरिता आवश्यक असलेले भूसंपादन करण्यासाठी आज वाल्हेकरवाडी येथील सर्वे क्र. ११५ ते १२१ मधील ७४ घरांना प्राधिकरणाने घर खाली करण्याची अंतिम नोटीस दिली आहे. सर्वे क्रमांक १२० आणि १२१ मधील बाधित घरांना लाल मार्किंग करीत लवकर घर रिकामे करण्याची सूचना दिली. पाच पक्की घरे आणि ६९ तात्पुरत्या स्वरूपातील घरे हटविण्यात येणार आहेत,
अशी माहिती प्राधिकरणाचे उपअभियंता अनिल दुधलवार यांनी दिली.
चिंचवड जकात नाका ते रावेत हा रस्ता वाल्हेकरवाडीमधून जात असून, रस्त्याचे काम आजही अपूर्णच आहे. हा रस्ता चिंचवड जुना जकात नाका येथून सुरुवात होऊन पुढे औंधमार्गे येणारा बीआरटी रस्ता रावेत येथे मिळतो. पुण्याहून मुंबईकडे जाणाºया लोकांसाठी हा एक चांगला
मधला मार्ग असून, या रस्त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचतो; पण या रस्त्याचे काम अर्धवट आहे.
प्राधिकरण हद्दीतील रस्त्याच्या कामाला ३१ डिसेंबर २०१४ रोजी सुरुवात झाली होती. तेथून पुढील रस्त्यासाठी आवश्यक असणारे भूसंपादन महापालिकेकडून न झाल्यामुळे अजूनही हा रस्ता वापरात नाही. या रस्त्याचा पूर्ण खर्च महानगरपालिका करणार होती; पण त्याची काही हद्द प्राधिकरणाच्या हद्दीत येत असल्यामुळे हा रस्ता प्राधिकरणाकडे सोपविण्यात आला. रस्त्याची पूर्ण लांबी ३.१५ किमी व रुंदी ३४.५ मी. असून, प्राधिकरणाच्या हद्दीतील २.६३ किमी रस्ता आणि पूल बांधून तयार आहे.
विकास आराखडा : महापालिका करणार रस्त्याचे काम
महापालिकेच्या हद्दीतील वाल्हेकरवाडी येथील सुमारे २०० मीटरपेक्षा जास्त जागेच्या संपादनाचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे हा रस्ता खुला करण्यात आला नाही. रस्त्यासाठी जवळपास ३७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, आतापर्यंत सुमारे १७ ते १८ कोटी रुपये खर्च झाला आहे. प्राधिकरणाच्या हद्दीतील रस्ता पूर्ण झाला असून, तो वापरण्यायोग्य आहे असेही जाहीर करण्यात आले आहे व प्राधिकरणाची जबाबदारी त्यांनी पार पडली आहे.
आता महानगरपालिकेची जबाबदारी असल्यामुळे त्यांच्याकडून काम होण्याची प्रतीक्षा नागरिकांना लागून राहिली आहे. हा महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ता राहिल्यामुळे वाहनचालकांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विकास आराखड्यानुसार रावेत ते चिंचवड जकात नाका मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाण ते नाल्यापर्यंतचा भाग नवनगर प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. तेथील भूसंपादन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येणार असून, महापालिका रस्त्याच्या अर्धवट अवस्थेतील काम करणार आहे.
नागरिकांची विनवणी
सर्वे क्र १२१ मधील दोन घरे पूर्णपणे पाडली जाणार आहेत, तर उर्वरित घरांचा काही भाग पाडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यात बाधित होणाºया घरांना प्राधिकरणाने अंतिम नोटीस दिली असून, ५ जानेवारीच्या आत घर रिकामे करण्यास सांगितले आहे. त्या अनुषंगाने बाधित नागरिकांनी सदर रस्ता पुढील बाजूस मोकळ्या असणाºया जागेतून करावा त्यामुळे आमची घरे वाचतील, अशी विनंती अधिकाºयांना केली. त्यावर आपले म्हणणे वरिष्ठांपर्यंत पोहोचवू, असे अधिकाºयांनी सांगितले.
कारवाई अटळ
४रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन करण्यात येणार असून ५ जानेवारी रोजी अंतिम नोटीस देण्यात आलेल्या आणि लाल मार्किंग केलेल्या घरांवर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार असून, त्यानंतर या कामासाठी आवश्यक असणारा निधी प्राधिकरण महापालिकेला हस्तांतरित करणार आहे. त्यानंतर या कामाची निविदा काढण्यात येणार असून, दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे अधिकाºयांनी सांगितले. या वेळी शाखा अभियंता हरिदास गायकवाड, एच. आर. गोखले आदी उपस्थित होते.