विवाहितेची राहत्या घरात आत्महत्या; लग्नानंतर ७ महिन्यातच उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 10:10 PM2022-01-17T22:10:15+5:302022-01-17T22:10:24+5:30
कामावर असताना पती रोहित यांनी पत्नी शीतल यांना सकाळी दहाच्या सुमारास फोन केला. त्यावेळी शीतल यांच्याशी त्यांचे बोलणे झाले. त्यानंतर पुन्हा दुपारी बाराच्या सुमारास यांनी फोन केला. मात्र पत्नी शीतल यांच्याकडून प्रतिसाद येत नव्हता
पिंपरी : विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वाकड येथे सोमवारी (दि. १७) दुपारी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
शीतल रोहित पवार (वय २८), असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शीतल पवार यांचे पती रोहित अशोक पवार (रा. वाकड) हे आयटी पार्कमध्ये नोकरीला आहेत. रोहित आणि शीतल यांचे जुलै २०२१ मध्ये लग्न झाले होते. शीतल या माहेरी गेल्या होत्या. रविवारी (दि. १६) त्या माहेराहून परत आल्या होत्या. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांचा पती रोहीत कामावर गेले. कामावर असताना पती रोहित यांनी पत्नी शीतल यांना सकाळी दहाच्या सुमारास फोन केला. त्यावेळी शीतल यांच्याशी त्यांचे बोलणे झाले. त्यानंतर पुन्हा दुपारी बाराच्या सुमारास यांनी फोन केला. मात्र पत्नी शीतल यांच्याकडून प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे रोहित यांनी त्यांच्या घरासमोरील महिलेला फोन करून संपर्क साधला. संबंधित महिलेने शीतल यांना आवाज दिला, मात्र शीतल यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत त्या महिलेने रोहित यांना सांगितले. त्यामुळे रोहित घरी आले. त्यांनी शीतल यांना दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र तरीही शीतल यांच्याकडू प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडला असता घरात शीतल यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.