रहाटणी येथे इमारतीला भीषण आग; कापड दुकान, डेंटल क्लिनिकमधील साहित्य जळून खाक, १ कोटींचे नुकसान
By नारायण बडगुजर | Updated: January 27, 2025 14:50 IST2025-01-27T14:49:10+5:302025-01-27T14:50:06+5:30
इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरही आगीचे लोळ आणि धुरामुळे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले

रहाटणी येथे इमारतीला भीषण आग; कापड दुकान, डेंटल क्लिनिकमधील साहित्य जळून खाक, १ कोटींचे नुकसान
पिंपरी : अचानक आग लागून कापड दुकान आणि डेंटल क्लिनिकमधील साहित्य खाक झाले. या भीषण आगीत एक कोटी १५ लाखांचे नुकसान झाले. रहाटणी येथील शिवार चौकातील राॅयल अव्हेन्यू या इमारतीत सोमवारी (दि. २७) रात्री पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली. शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
काळेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी येथील शिवार चौकात राॅयल अव्हेन्यू ही पाच मजली इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर आदित्य फॅशन हब नावाचे कापड दुकान आहे. या इमारतीत सोमवारी रात्री अचानक आग लागली. आदित्य फॅशन हब या दुकानात कापड असल्याने आगीने लगेचच रौद्र रुप घेतले. आगीचे लोळ आणि धुराचे लोट दुकानातून बाहेर आले. यात दुकानाच्या वरच्या मजल्यावरील दातांच्या दवाखान्याला देखील आग लागली. दवाखान्यातील खूर्ची, फर्निचर, इलेक्ट्रिक बर्ड खाक झाले. इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरही आगीचे लोळ आणि धुरामुळे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यात जिवीतहानी झाली नाही. आगीत एक कोटी १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
रहाटणी येथे इमारतीला भीषण आग;
— Lokmat (@lokmat) January 27, 2025
कापड दुकान, डेंटल क्लिनिकमधील साहित्य खाक#pimprichinchwad#fire#shoppic.twitter.com/d0aZDqjzJy
दरम्यान, माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य केंद्रातील दोन, तसेच भोसरी, चिखली, मोशी, रहाटणी आणि थेरगाव केंद्रातील प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून पहाटे चार वाजता आगीवर नियंत्रण मिळवले.
क्षणात सर्वकाही खाक झाले
राॅयल अव्हेन्यू या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर डाॅ. वैशाली ठोके यांचे डेंटल क्लिनिक आहे. आग लागल्याबाबत डाॅ. वैशाली यांना रात्री दोनच्या सुमारास माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्च करून दवाखान्याचे नूतनीकरण केले होते. मात्र, आग लागून क्षणात सर्वकाही खाक झाले, असे डाॅ. वैशाली यांनी सांगितले.