पिंपरीत पगार अर्धवट दिल्याने माथाडी कामगारांचे आंदोलन; २७ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 14:56 IST2022-03-22T14:56:16+5:302022-03-22T14:56:31+5:30
पूर्व कल्पना न देता आंदोलन करून बेकायदेशीर जमाव केल्या प्रकरणी २७ माथाडी कामगारांच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरीत पगार अर्धवट दिल्याने माथाडी कामगारांचे आंदोलन; २७ जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी : पूर्व कल्पना न देता आंदोलन करून बेकायदेशीर जमाव केल्या प्रकरणी २७ माथाडी कामगारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चिंचवड येथे १४ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
मंगेश काटे, बाबा कांडर व इतर २० ते २५ माथाडी कामगार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संजय दामोदर जोशी (वय ५८, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २१) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे चिंचवड येथील मालधक्क्याजवळ कार्यालय आहे. या कार्यालयात फिर्यादी हे लेखापाल म्हणून नोकरीस आहेत. पगाराची सर्व रक्कम का दिली नाही, या कारणावरून माथाडी कामगारांनी १४ फेब्रुवारीला दुपारी एकच्या सुमारास बेकायदेशीर जमाव करून आंदोलन करणार आहे याची पूर्वकल्पना दिली नाही. स्वत:च्या व इतरांच्या जिवीतास धोका होईल, असे कृत्य केले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक शंभू रणवरे तपास करीत आहेत.