माथाडी कामगारांचा संप, शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:14 AM2018-01-31T03:14:28+5:302018-01-31T03:14:38+5:30
महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळ एकत्र करून एकच माथाडी मंडळ स्थापन करण्याचा शासनाने घाट केला आहे. माथाडी कामगार चळवळ मोडीत काढून उद्योजकांनी पाठराखण करून माथाडी कामगारांना बेरोजगार करण्याचा शासनाचा निर्णय निषेधार्ह आहे
पिंपरी : महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळ एकत्र करून एकच माथाडी मंडळ स्थापन करण्याचा शासनाने घाट केला आहे. माथाडी कामगार चळवळ मोडीत काढून उद्योजकांनी पाठराखण करून माथाडी कामगारांना बेरोजगार करण्याचा शासनाचा निर्णय निषेधार्ह आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सेक्रेटरी संग्राम पाटील यांनी
केले.
महाराष्ट्रातील ३६ माथाडी मंडळाचे विलीनीकरण करून एकच माथाडी मंडळ गठीत करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरुद्ध पिंपरीतील कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ््यासमोर पिंपरीतील सर्व संघटनांकडून एक दिवसीय लाक्षणिक संप करण्यात आला. या वेळी संग्राम पाटील कामगारांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन उपाध्यक्ष पोपट धोंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि पुणे जिल्हा माथाडी कामगार सेवाचे सचिव प्रल्हाद खेडकर, निगडी येथील असोसिएशन आॅफ ट्रान्सपोर्ट हमाल पंचायतचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत संप पुकारण्यात आला होता. सर्वप्रथम पिंपरी येथील केएसबी चौकातील कै. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करून लाक्षणिक संप पुकारून शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला.
निगडी ट्रान्सपोर्टनगरी भागात रॅली काढली. निगडी परिसरातील सर्व गोडावून बंद होते. चाकण, म्हाळुंगे, वडगाव मावळ, पिंपरी-चिंचवड एमआयडीसीतील सर्व माथाडी कामगार सहभागी झाले होते.