काळेवाडीतील गादी कारखान्यास आग, दोन जखमी, आठ ते दहा लाखांचे नुकसान

By विश्वास मोरे | Published: June 3, 2024 04:49 PM2024-06-03T16:49:34+5:302024-06-03T16:50:30+5:30

अग्निशमन दलाचे आठ ते १० बंब घटनास्थळी तत्काळ दाखल झाले असून अवघ्या दीड तासांत अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले

Mattress factory fire in Kalewadi two injured loss of eight to ten lakhs | काळेवाडीतील गादी कारखान्यास आग, दोन जखमी, आठ ते दहा लाखांचे नुकसान

काळेवाडीतील गादी कारखान्यास आग, दोन जखमी, आठ ते दहा लाखांचे नुकसान

वाकड : सकाळची साडे अकराची वेळ... सगळे आपापल्या कामात व्यस्त..., तेवढ्यात अग्निशमन दलाच्या गाड्यांचा आवाज काळेवाडीतील विजयनगर परिसरात घुमू लागला. येथील एका कारखान्याला सोमवारी भीषण आग लागली होती. कारखान्यात कपडे, गादी, कागद असा माल असल्याने त्याच्या धूराचे लोट उठत होते. अग्निशमन दलाचे आठ ते १० बंब घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यानंतर अवघ्या दीड तासांत अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीत दोन जखमी, दोन्ही कारखाने मिळून आठ ते दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.  

काळेवाडी येथील विजयनगर परिसरातील कारखान्याला सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. हि आग विजयनगर परिसरात एकाच पत्र्याच्या शेडमध्ये दोन कारखाने आणि एक गोदामास लागली होती. तिथे कपडे, गाद्या अन् कागदी साहित्य होते. या शेडला सोमवारी सकाळी अकराच्या सुमारात भीषण आग लागली. वाऱ्यामुळे आगीने पेट घेतला आणि धूराचे लोळ दिसू लागले. त्यानंतर किनारा कॉलनी आणि शेजारील अरुंद रस्त्याने अग्निशमन दलाचे जवान आत गेले. याठिकाणी एमआयडीसी, स्मार्ट सिटी आणि पुणे शहरातून गाड्या मागवल्या होत्या. साधारणपणे दुपारी एक वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली. यावेळी धुराचे लोळ आणि येथील वातावरण भीतीदायक होते. तर आजू-बाजूच्या इमारतीमधील नागरिक घाबरून इमारतीच्या खाली येत होते. 
 
रस्ता केले बंद 
 
काळेवाडी कडून विजयनगरकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला होता. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलिस यांच्या गाड्यांव्यतिरिक्त कोणतीच गाडी आत सोडायला पोलिसांनी मनाई केली होती. आग लागलेला कारखाना सोसायटीच्या शेजारून जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना आत जाण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. तोपर्यंत साधारण आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात आणली गेली. या परिसरात एकच शेडमध्ये दोन कारखाने व गोदाम चालवले जात होते. गोदामात कपडे आणि गादीचे साहित्य होते. तर एका कारखान्यात कागदी, वापरा आणि टाका अशा प्लेट बनवल्या जात होत्या. 

निवासी भागात कारखाना आणि गोदाम  

सकाळी आकराच्या सुमारास शेडमध्ये आग लागल्याचे लक्षात आले. आणि नागरिकांनी अग्निशमन दलाला संपर्क केला. अग्निशमन दलाच्या गाड्यांचे आवाज येताच आजू बाजूच्या नागरिकांनी गर्दी केली. आधीच अरुंद रस्ता आणि नागरिकांची गर्दी यामुळे गाड्यांना वळायला अडचण निर्माण होत होती. पोलिसांनी गर्दी बाजूला करत गाड्यांना वाट करून दिली. धुराचे लोट हवेत दिसत होते. कारखान्याच्या आजू बाजूला मोठ्या प्रमाणात निवासी गृह प्रकल्प असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. निवासी जागेत कारखाना आणि गोदाम वापरा साठीशेड बांधली असून शेडपर्यंत जाण्यासाठी अरुंद रस्ता आहे. आग लागल्याचे वेळेत लक्षात आल्याने पुढील मोठी हानी टळली. 

एकाच शेडमध्ये दोन व्यवसाय 

बांधण्यात आलेल्या एकाच शेडमध्ये कारखाना आणि गोदाम असे दोन व्यवसाय सुरू होते. कागदी प्लेट बनवण्याचा कारखाना तर कापड आणि गादीचे गोदाम या ठिकाणी होते. त्यामुळे आगीत दोनही व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे. 

'' पुढील काही दिवसात गोदामांचे सर्वेक्षण केले जाईल. तसेच निवासी जागेत कारखाना कसा काय यासाठी सर्व गोष्टींची तपासणी करण्यात येईल. अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून योग्य ती खबरदारी पुढील काळात घेतली जाईल. '' - प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगपालिका

Web Title: Mattress factory fire in Kalewadi two injured loss of eight to ten lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.