माऊली दाभाडे यांच्या निलंबनाचा ठराव
By Admin | Published: March 5, 2017 04:26 AM2017-03-05T04:26:33+5:302017-03-05T04:26:33+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते, संत तुकाराम साखर कारखाना संचालक माऊली दाभाडे
वडगाव मावळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते, संत तुकाराम साखर कारखाना संचालक माऊली दाभाडे यांच्यावर सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन करण्याचा ठराव कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीत केल्याची माहिती तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, मला पक्षातून काढून टाकण्याचे खट्याळ आणि ठेंगड्या मनोवृत्तीचे दर्शन आहे, अशी टिका दाभाडे यांनी केली.
निवडणुकीत गटातटाच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीचा पराभव झाला. त्या संदर्भात आयोजित कार्यकर्ता चिंतन बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी चर्चा करून माऊली दाभाडे यांनी पक्षविरोधी काम केल्याचा आरोप करत त्यांना पक्षातून निलंबित करावे अशी मागणी केली.
बंडखोरी केलेल्या बाबुराव वायकर, नारायण ठाकर, दत्तात्रय पडवळ, राजेंद्र कुडे, तुकाराम आसवले यांची यापूर्वीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात दाभाडे यांनी समांतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची घोषणा केली व बंडखोर उमेदवारांना ताकत देत त्यांना पाठिबा दिला. निवडणुकीत राष्ट्रवादीतून बाहेर पडून अपक्षांचे काम केले, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. दाभाडे यांची पक्षातून निलंबन करण्याचा ठराव अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांना पाठवण्यात आला आहे. मदन बाफना, बाळासाहेब नेवाळे, रमेश गायकवाड, अमोल केदारी, शुभांगी राक्षे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
ठेंगड्या मनोवृत्तीचे दर्शन
माऊली दाभाडे म्हणाले, ‘‘मुळात जो पदाधिकारी राष्ट्रवादी काँगे्रसचा क्रियाशील सभासद नाही, असा व्यक्ती माझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर कारवाई करतो, हे ठेंगड्या मनोवृत्तीचे दर्शन आहे.’’