माऊलींचे पालखी प्रस्थान ६ जुलैला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:05 AM2018-03-28T02:05:33+5:302018-03-28T02:05:33+5:30
श्री संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे ६ जुलैला आळंदीतून प्रस्थान होत आहे.
आळंदी : श्री संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे ६ जुलैला आळंदीतून प्रस्थान होत आहे. ‘श्रीं’च्या पालखी सोहळाप्रमुखपदी अॅड. विकास ढगे-पाटील यांची निवड झाल्याची माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांनी दिली.
श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटीच्या पुणे कार्यालयात या निवडीसाठी प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत मासिक सभा झाली. या सभेत उपस्थित विश्वस्त मंडळांच्या चर्चेनंतर अॅड. पाटील यांची पालखी सोहळाप्रमुखपदी निवड झाली.
अलंकापुरीतून ६ जुलैला पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. आळंदी ते पंढरपूर या मार्गावर प्रस्थानानंतर ठिकठिकाणी १६ मुक्काम होतील. ६ जुलैला पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाल्यानंतर हरिनाम गजरात पायी वारीतून प्रवास करीत १७व्या दिवशी ‘श्रीं’चा पालखी सोहळा २२ जुलैला वाखरी मार्गे पंढरीला येईल. २३ जुलैला आषाढी एकादशी सोहळ्यात साजरी होईल.
सोहळ्यातील पायी वारी प्रवासात भाविक, वारकरी, नागरिक आणि प्रवासात सेवासाधने असणारी वाहनव्यवस्था प्रभावी ठेवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाला दक्षता घेण्याचे दृष्टीने संस्थान कमिटीने सेवासुविधांसाठी मागण्यांचे निवेदन दिले आहे.
पायी वारी काळात भाविकांना सुलभ दर्शनव्यवस्था, पालखी विसावे, मुक्कामाचे ठिकाणी आरोग्य, स्वच्छता, पालखीतळ परिसरात सेवासुविधा मिळण्यासाठी संस्थानाने प्राधान्य दिले आहे. यासाठी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, सेवक बाळासाहेब चोपदार रणदिवे, राजाभाऊ चोपदार रंधवे, पालखी सोहळा दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष मारुती कोकाटे, आळंदी देवस्थानाचे विश्वस्त पदाधिकारी यांनी पालखी मार्गावरील तळांची संयुक्त पाहणी केली. दरम्यान, पाहणीत सेवासुविधांसाठी तसेच स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, इंधन व्यवस्था आदींबाबत समस्या जाणून घेतल्या. अधिक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आळंदी संस्थान मासिक सभेत चर्चा करून पुणे विभागीय आयुक्त, पुणे, सातारा, सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तळावरील सोयीसुविधांसाठी साकडे घालण्यात आले आहे. यासाठी प्रमुख विश्वस्त टिळक यांनी निवेदन दिले असल्याचे सांगितले.
पालखीतळाला संरक्षक भिंतीचे बांधकाम, तळांचे सपाटीकरण, मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात यावे, श्रींची पालखी विसावण्यासाठी ७ फूट लांब, ४ फूट रुंद व २ फूट उंच मजबूत कट्टा ओटा विकसित करावा, या ओट्यासमोर कीर्तन, जागर धार्मिक कार्यक्रमासाठी ७० फूट लांब आणि ३० फूट रुंद जागेत सिमेंटीकरणाचे काम करण्यात यावे, श्रींचे भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्थेसाठी दर्शनबारी, तळ परिसरात चारही बाजूंनीपिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, स्वच्छतागृहे तसेच विद्युत व्यवस्था अखंड ठेवण्याची दक्षता घेतली जावी अशी मागणी डॉ. अभय टिळक यांनी केली आहे.