>
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 17 - राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतो याचा प्रत्यय सध्या मावळ तालुक्यात येत असून जसजशी मतदानाची तारिख जवळ येऊ लागली आहे तसतसे राजकारणाचे वारे चित्रविचित्र वाहू लागले आहेत. मावळ तालुक्यात काँग्रेस आय पक्षाने अधिकृत पत्रक काढत शिवसेनेच्या कुसगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सत्यभामा शांताराम गाडे, कुसगाव पंचायत समितीच्या उमेदवार उषा संजय घोंगे, वाकसई पंचायत समितीचे सदस्य बाबु शेळके, चांदखेड पंचायत समितीच्या उमेदवार मनिषा आनंदा मालेकर (केदारी) यांना जाहिर पाठिंबा दिला असल्याचे काँग्रेस आयचे मावळ तालुका कार्याध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, संभाजी राक्षे व भरत दळवी यांच्या सदर पाठिंबा पत्रकावर स्वाक्षर्या आहेत. काँग्रेस पक्षाची कुसगाव जिल्हा परिषद गटात व चांदखेड पंचायत समिती गणात चांगली ताकद आहे. ही ताकद शिवसेनेच्या मागे पुर्ण क्षमतेने उभी करुन शिवसेना उमेदवार निवडून देण्याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात आले आहे. या बदल्यात काही जागांवर शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांना मदत करणार असल्याचा अंतर्गत समजोता झाला आहे.
दोनच दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडखोरांची मोठ बांधत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे यांनी समांतर राष्ट्रवादी पक्ष तयार करत राष्ट्रवादी समोर आव्हान निर्माण केले आहे तर दुसरीकडे काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देत भाजपाची कोंडी करण्याची तयारी केली आहे. वास्तविक मावळात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाची मोठी ताकद आहे. बहुतांश काळ या दोन पक्षांकडे तालुक्यातील राजकिय शक्तीस्थळे असून देखिल मावळ तालुक्याचा अपेक्षित विकास झालेला नाही याच करिता मतदानाकरिता अवघा काही दिवसांचा अवधी राहिला असताना या दोन्ही पक्षांना रोखण्यासाठी राजकिय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीत उघड बंडखोरी असली तरी भाजपात सर्व अल्बेल आहे असं नाही. भाजपामध्ये देखिल उमेदवारी न मिळालेल्या इच्छूकांमध्ये आजुनही नाराजीचा सूर कायम आहे. कोणी उघड बंडखोरी केली नसली तर इच्छूकांची नाराजी भाजपासाठी डोकेदुखी ठरु शकते.