मावळात बंडखोरांची कॉँग्रेससोबत आघाडी
By admin | Published: February 16, 2017 03:12 AM2017-02-16T03:12:15+5:302017-02-16T03:12:15+5:30
तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काही मतदारसंघांत समांतर राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आणि कॉँग्रेस यांची आघाडी
वडगाव मावळ : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काही मतदारसंघांत समांतर राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी आणि कॉँग्रेस यांची आघाडी झाली आहे. काही मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. समांतर
राष्ट्रवादी आघाडीचे प्रमुख माऊली दाभाडे व जिल्हा कॉँग्रेसचे उपाध्यक्ष चद्रकांत सातकर यांनी कान्हे फाटा येथे घोषणा केली.
राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील बंडखोर उमेदवारांची दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली ही आघाडी कॉँग्रेसला पाठिंबा देणार असल्याने राष्ट्रवादीच्या अडचणींत वाढ होणार असल्याचे बोलले
जाते. पत्रकार परिषदेला या वेळी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश काजळे, रोहिदास वाळुंज, बाजार समिती सभापती बबनराव भोंगाडे, अशोक सातकर, नाना खांदवे आदी उपस्थित होते.
दाभाडे यांनी सांगितले की, वडगाव-खडकाळा व टाकवे-वडेश्वर गट आणि वडगाव, सोमाटणे व कुसगाव या गणात आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. दोन दिवस लढतीची परिस्थिती पाहून गटात पाठिंब्याचा निर्णय घेण्यात येईल. टाकवे गणात दत्तात्रय पडवळ, वडेश्वर गणात नारायण ठाकर, वडगाव गणात राजेंद्र कुडे, खडकाळा गणात कॉँग्रेसच्या पूनम सातकर हे उमेदवार आघाडीचे असतील. गेली २० वर्षे मावळात शेतकऱ्यांसाठी भाजपा म्हणजे विषारी पुडी ठरली आहे. या जातीयवादी पक्षाला संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे सातकर यांनी सांगितले. (वार्ताहर)