मावळच्या सत्तर लाख गुलाबांचा परदेशात दरवळ
By admin | Published: February 14, 2017 01:57 AM2017-02-14T01:57:16+5:302017-02-14T01:57:16+5:30
मावळ तालुक्यातून या वर्षी व्हॅलेंटाइन डेकरिता तब्बल ७० ते ७५ लाख फुले परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यात आली.
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातून या वर्षी व्हॅलेंटाइन डेकरिता तब्बल ७० ते ७५ लाख फुले परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यात आली. यामध्ये टॉप सिक्रेट नावाच्या लाल रंगाच्या गुलाबाला परदेशी बाजारात मोठी मागणी आहे. तालुक्यात २५० हेक्टर क्षेत्रावर पॉली हाऊसच्या माध्यमातून गुलाबपुष्पाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी १५० ते १७५ हेक्टर क्षेत्रावरून परदेशी बाजारात व्हॅलेंटाइन डेकरिता फुले निर्यात केली जातात.
या वर्षी सुमारे पाऊणकोटी गुलाब फुलांची निर्यात झाल्याचा अंदाज पवना फुलउत्पादक संघाचे वितरण प्रमुख मुकुंद ठाकर यांनी सांगितले.
ठाकर म्हणाले, पवना फुलउत्पादक संघाच्या माध्यमातून २० एकर क्षेत्रात सहा लाख गुलाब फुलांचे उत्पादन करण्यात आले असून, यापैकी पाच लाख फुले प्रत्यक्ष परदेशी बाजारात निर्यात केली आहेत. २६ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान ही निर्यात झाली. या काळात सर्वच पॉलीहाऊसमध्ये गुलाबफुले पॅकिंगची धावपळ सुरु होती.
मावळातील वातावरण या वर्षी गुलाबांकरिता पोषक राहिल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. रोगांचा प्रभावदेखील कमी राहिला. मात्र, परदेशी बाजारपेठेसह स्थानिक बाजारपेठेची मागणी काही प्रमाणात कमी राहिल्याने फुलांना परदेशी बाजारपेठेत सरासरी १२ ते १५ रुपये तर स्थानिक बाजारपेठेमध्ये ५ ते ७ रुपये भाव मिळाला.
दर वर्षी पॉली हाऊस व फुल उत्पादनाचा खर्च वाढत असला, तरी त्या प्रमाणात बाजारभाव मिळत नाही अशी खंत ठाकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ३० एप्रिल २०१६ पासून शासनाने पॉलीहाऊसला दिले जाणारे अनुदान बंद केले असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ते अनुदान पुन्हा सुरू करावे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला स्थानिक बाजारपेठेसह परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून सहकार्य मिळाल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते.
लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या पॉली हाऊसमधून मिळणारे उत्पादन लहान शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात कवडीमोल भावाने विकावे लागते. याकरिता पवना फुलउत्पादक संघाच्या माध्यमातून चंद्रकांत कालेकर, ज्ञानेश्वर ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, विश्वनाथ जाधव व मुकुंद ठाकर या पाच शेतकऱ्यांनी एकत्र येत पॉलीहाऊसमधील माल परदेशी बाजारपेठेत विक्री करण्याची स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. त्या माध्यमातून सध्या परदेशी बाजारपेठेत दर दिवशी १५० बॉक्स फुले विक्री केली जात आहेत. (वार्ताहर)