मावळ परिसर : बदलत्या वातावरणामुळे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:39 AM2018-07-13T01:39:44+5:302018-07-13T01:39:53+5:30
वातावरणातील सततचा बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. पाऊस व थंड वातावरणामुळे सरकारी रुग्णालयासह लहान मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
करंजगाव - वातावरणातील सततचा बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. पाऊस व थंड वातावरणामुळे सरकारी रुग्णालयासह लहान मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
वातावरणातील या बदलांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर जाणवू लागला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
नाने मावळात मोठ्या प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणी थेट ग्रामपंचायतच्या मोटारीद्वारे घरोघरी जाते. परंतु घरोघरी जाणारे पाणी फिल्टर होत नसल्यामुळे दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला इतर अजारांचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती कोंडिवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष विष्णू गायकवाड यांनी दिली.
मावळातील अनेक गावांमध्ये आठवडे बाजार भरतो. या बाजारात अनेकदा उरलेला भाजीपाला
रस्त्यावर टाकला जातो. हा भाजीपाला वेळेत न उचलल्याने त्यावर पावसाचे पाणी पडल्यास दुर्गंधीसह रोगराई पसरण्यास मदत होते. त्यामुळे बाजारातील भाजीपाला व कचरा प्रशासनाने तातडीने उचलावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पावसाळ्यात दूषित पाणी पिऊ नये. उकळून पाणी प्यावे. अन्यथा अतिसार, जुलाब असे जलजन्य आजार होण्याची शक्यता असते. बाहेरील उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. यासह आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आवश्यक आहे.
- डॉ. किशोर यादव,
वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र देहू.
जंतुनाशक फवारणीची गरज
पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीने गावोगावी जंतुनाशक फवारणी करावी जेणे करून नागरिकांचे आरोग्य सुधारले जाईल, असे उद्योजक अशोक कांबळे म्हणाले.
नागरिकांनी सडका भाजीपाला, उरलेले अन्न, इतर पदार्थ थेट घराच्या आजू बाजूला न टाकता थेट शेनकई (शोष खड्ड्यात) मध्ये टाकावेत, अशी माहिती कृष्णा ठाकर यांनी दिली.
जोरदार पावसामुळे खेडेगावमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर शाळांच्या पटांगणामध्ये डबके साचलेले आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे़