मावळातील डॉक्टरांना रात्रीच्या वेळी मुख्यालय न सोडण्याचे इंजेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 05:42 PM2018-08-04T17:42:27+5:302018-08-04T17:43:17+5:30
मावळ तालुक्यातील शासकीय दवाखान्यात लोकमतने स्टिंग आॅपरेशन केले होते. यामध्ये डॉक्टरांची गैरहजेरी,औषध भंडार, स्वच्छता गृह बंद,रूग्णालयात रात्रीच्य वेळी न राहणे अशा विविध समस्या उघड झाल्या होत्या.
वडगाव मावळ : आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी राहून रूग्णांना आरोग्य सेवा द्यावी या आदेशाचे जो पालन करणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला. मावळ तालुक्यातील शासकीय दवाखान्यात लोकमतने स्टिंग आॅपरेशन केले होते. यामध्ये डॉक्टरांची गैरहजेरी,औषध भंडार, स्वच्छता गृह बंद,रूग्णालयात रात्रीच्य वेळी न राहणे अशा विविध समस्या उघड झाल्या होत्या. लोकमतच्या बातमीची दखल घेऊन पुणे जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे म्हणाले, तालुक्यात ६ आरोग्य केंद्र ,३६ उपकेंद्र आहेत. याठिकाणी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना राहण्याचे आदेश लेखी स्वरूपात दिले आहेत. या आदेशाचे पालन न करणा-या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लेखी अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल. लोकमतची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतरच पुणे जिल्हा परिषदेत आढावा बैठक झाली. यात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य का़र्यकारी अधिकारी सुरज मांढरे व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी डॉक्टरांना धारेवर धरले.