अंदर मावळ चार दिवस अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 06:19 AM2018-03-09T06:19:02+5:302018-03-09T06:19:02+5:30
मावळात गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भरमसाठ वीजबिल वेळेवर भरूनही ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कामशेत - मावळात गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. भरमसाठ वीजबिल वेळेवर भरूनही ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. वीजवितरण महामंडळाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून, या भागालाच दुजाभावाची वागणूक का दिली जाते, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. सध्या दहावीची परीक्षा सुरू असून अंदर मावळात मागील चार दिवसांपासून वीज नसल्याने विद्यार्थ्यांवर मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करण्याची वेळ आली आहे.
मागील काही महिन्यांपासून नाणे, पवन, अंदर मावळासह कामशेत शहरात वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार वाढले असून, काही दुर्गम गावांमध्ये वीज गेल्यानंतर ती दोन दोन दिवस येत नाही. वीज महामंडळाने भारनियमन नसताना अघोषित भारनियमन सुरू केले आहे. यामुळे नागरिकांसह अनेक दुकानदार त्रस्त झाले आहेत. गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद केला जातो. त्या शिवाय आठवड्यातून अनेकदा वीज गायब होते. तेव्हा कोणते दुरुस्तीचे काम करीत असतात. असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.
अंदर मावळात मागील चार दिवसांपासून वीज गेली असून
अद्याप पूर्ववत झाली नसल्याची तक्रार राजू खांडभोर, नारायण ठाकर, निवृत्ती वाडेकर, गुलाब गबाले, कुंडलिक लष्करे, कैलास खांडभोर, भरत लष्करे, दशरथ वाडेकर, छगन लष्करे, बळीराम वाडेकर आदींनी केली आहे. दहावीच्या परीक्षा सुरु असताना वीज गायब झाल्याने मोठा त्रास होत असून याविषयी महावितरण कार्यालयात तक्रार देऊन ही उपाययोजना होत नाहीत.
परिस्थिती जैसे थे : आश्वासनांचा विसर
१मावळातील वारंवार खंडित होणाºया वीजेचा प्रश्न ताबोडतोब मार्गी लावावा यासाठी काही महिन्यांपूर्वी नागरिकांनी महावितरण कार्यालयावर टाळे ठोको आंदोलन ही केले होते. त्या वेळी वीज महावितरणच्या अधिकाºयांनी पंधरा दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनांचा म्हणावा तसा फायदा झाला नाही.
२वीज वितरण मंडळाची ‘जैसे थे’ अशीच स्थिती आहे. वेळेनंतर येणारी मोठ मोठी रकमेची विजेची बिले भरूनसुद्धा वीज ग्राहकाला वीजेविनाच राहावे लागत असल्याने मावळातील वीजग्राहक राजा संतापला आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करूनही योग्य दखल घेतली जात नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे.