महापौर बदलाच्या हालचाली

By admin | Published: August 8, 2016 01:11 AM2016-08-08T01:11:03+5:302016-08-08T01:11:03+5:30

पक्षादेश न पाळणाऱ्या महापौर शकुंतला धराडे यांना हटविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे.

Mayor Change Movement | महापौर बदलाच्या हालचाली

महापौर बदलाच्या हालचाली

Next

पिंपरी : पक्षादेश न पाळणाऱ्या महापौर शकुंतला धराडे यांना हटविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना हटवावे, या मागणीसाठी रविवारी नगरसेवक आणि पदाधिकारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार होते. मात्र, नागपंचमी सणामुळे ही भेट आणि बैठक झाली नसून, येत्या दोन दिवसांत बैठक होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
थेरगाव येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात माजी आमदार विलास लांडे यांनी महापौर आणि सत्तारूढ पक्षनेत्यांना बदला, अशी मागणी केली होती. मुदत संपूनही संधी न दिल्याबद्दल पक्षश्रेष्ठींकडे नगरसेविका आशा सुपे यांनी मागणी केली होती. मात्र, महापौरपद केवळ भोसरी विधानसभेला जाऊ नये, म्हणून राष्ट्रवादीतील एका गटाने याच महापौर असूद्यात, अशी मागणी केली होती. त्यामुळे अजित पवार यांनीही तूर्तास बदल नाही, असे संकेत दिले होते. गेल्या दोन महापालिका सभांमध्ये महापौरांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. पक्षादेश न पाळणाऱ्या महापौरांविरोधात त्यांनाच यापूर्वी पाठिंबा देणारे स्थानिक नेते उभे राहिले आहे.


महापौर धराडे यांच्यावर आमदार लक्ष्मण जगताप गटाचा शिक्का आहे. आमदार जगताप हे भाजपात गेल्याने धराडे यांची महापालिकेत गोची झाली आहे. मात्र, त्यांनी सत्तारूढ पक्षनेत्यांशी जुळवून घेतल्याने मुदत संपूनही धराडे यांना महापौर पदावर कायम ठेवले होते. निवडणूक जवळ येऊ लागली, तशी महापौर अधिकार गाजवून पक्षादेश पाळत नाहीत, ही बाब राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या लक्षात आल्याने त्यांना हटविण्याची मोहीम पुन्हा सुरू झाली आहे.

आशा सुपे, रामदास बोकड
यांची नावे चर्चेत
महापौरपद अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने धराडे यांना संधी मिळाली होती. या पदासाठी आशा सुपे आणि रामदास बोकड हेही इच्छुक होते. महापौर भाजपाचा छुपा अजेंडा राबवीत असल्याचे राष्ट्रवादीच्या निदर्शनास येऊ लागल्याने धराडे यांना बदलण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे सुपे, की बोकड यापैकी कोणाला संधी मिळणार, याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे.
धराडे यांच्यावर जगताप गटांचा शिक्का होता. बोकड यांच्यावरही जगतापांच्याच नावाचा शिक्का आहे. आशा सुपे यांच्यावर माजी आमदार लांडे गटाचा शिक्का आहे. राष्ट्रवादीतील गटातटांमुळे भोसरीला महापौरपद मिळू नये, म्हणून राष्ट्रवादीतील स्थानिक नेते प्रयत्न करीत आहेत. मात्र, बोकड यांच्याऐवजी सुपे यांना संधी मिळणार असल्याचे राष्ट्रवादीच्या वर्तुळात बोलले जात आहे.

Web Title: Mayor Change Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.