महापौर, उपमहापौर निवड ४ आॅगस्टला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 03:13 AM2018-07-27T03:13:15+5:302018-07-27T03:13:47+5:30
ओबीसीसाठी आरक्षित : इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन महापौर आणि उपमहापौर कोण होणार याचा निर्णय मंगळवारी होणार आहे. महापौर, उपमहापौरपदासाठी मंगळवारी
दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज करायचे आहेत. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर लगेच महापौर, उपमहापौर कोण होणार हे स्पष्ट होणार असून, महापौरपदाची प्रत्यक्ष निवडणूक ४ आॅगस्टला सकाळी ११ला विशेष सभेत होणार आहे.
चिंचवड येथील चापेकर स्मारक उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात आले होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी काळजे आणि मोरे यांचे राजीनामे घ्यावेत, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी महापौर आणि उपमहापौर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या मंगळवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. शनिवारी सकाळी ११ला महापालिकेच्या विशेष सभेचे आयोजन केले आहे. या सभेत महापौर, उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. पीठासन अधिकारी म्हणून पीएमपीच्या संचालक नयना गुंडे कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.
उपमहापौरपदासाठी इच्छुकांची संख्या कमी
महापौरपदासाठी नगरसेवक राहुल जाधव, संतोष लोंढे, नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम यांच्यात स्पर्धा असून, पदासाठी चुरस आहे. महापौरपदासाठी आमदार महेश लांडगेसमर्थक राहुल जाधव, संतोष लोंढे आणि आमदार लक्ष्मण जगतापसमर्थक नगरसेवक शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम व नामदेव ढाके यांच्यापैकी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा आहे. स्थायी समिती सभापतिपद चिंचवड मतदारसंघात असल्यामुळे महापौरपद भोसरी मतदारसंघाकडे कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.